Pune District : शिक्रापूर पोलिसांची चोरांंसोबत झटापट

विकास पाटील व राम जाधव यांनी आवळल्या चोरांच्या मुसक्या
शिक्रापूर – शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरी करून गेल्यानंतर पुन्हा दुसर्या दिवशी चोरी करण्यासाठी आलेल्या दोघा सराईत चोरांना हवालदार विकास पाटील व राम जाधव यांनी रात्रीच्या सुमारास पाठलाग करत त्यांच्याशी झटापट करून अखेर त्यांना पकडले.
शिक्रापूर येथील करंजेनगर येथे दोन दिवसांपूर्वी एका ठिकाणी चोरीची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस ठाण्याचे हवालदार विकास पाटील व राम जाधव हे दोघेजण रात्री गस्त घालत होते. त्यांना दोन संशयित युवक आढळले. त्यांनी त्या युवकांना थांबण्याचा इशारा केला.
पोलिसांना बघून ते दोघे दुचाकीहून पळून जाऊ लागले. मात्र, विकास पाटील व राम जाधव या दोघांनी पळत दुचाकीचा पाठलाग करून त्यांना पकडले. या चोरांनी पिंपरी चिंचवड मधून चोरी केलेल्या दुचाकीहून शिक्रापूरमध्ये चोरी केली होती. त्यानंतर पुन्हा आज चोरी करण्यासाठी आलो असल्याचेही त्यांनी चौकशीत सांगितले.
सदर घटनेत पोलिसांनी शेखर संभाजी जाधव (वय २५, रा. मोघा, ता. उदगीर, जि. लातूर) याच्यासह त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्यांनी शिक्रापूर येथे दोन ठिकाणी चोर्या केल्याची कबुली चौकशी दरम्यान दिली. या घटनेमुळे भविष्यात अशा चोर्या कमी होण्याची एक आशा निर्माण झाली आहे.
विकास पाटील व राम जाधव यांचे कौतुक
शिक्रापूर पोलीस ठाण्याचे हवालदार विकास पाटील व राम जाधव यांनी रात्रीच्या सुमारास पाठलाग करत सराईत चोरांंना पकडले. या दोन पोलीस कर्मचार्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शेखर जाधववर दहा गंभीर गुन्हे
शिक्रापूर पोलिसांनी रात्री पाठलाग करत पकडलेल्या दोघा आरोपींवर चोर्यांचे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी शेखर जाधव याच्यावर लातूर व पुणे येथील चोर्यांचे वेगवेगळे दहा गुन्हे दाखल असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले.





