पुणे जिल्हा : शरद सोनवणे मुंबईला रवाना ; मुख्यमंत्र्यांनी पाठवले हेलिकॉप्टर

राजुरी : जुन्नर येथील विधानसभा निवडणूक अतीशय अटीतटीची झाली. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार शरद सोनवणे विजयी झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्पष्ट बहुमत असताना देखील तसेच त्यांच्या पक्षाला 57 जागा मिळाल्या असल्या तरी देखील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेले शरद सोनवणे यांना नेण्यासाठी जुन्नर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चक्क हेलिकॉप्टर पाठवले असल्याची चर्चा जनतेत रंगू लागली आहे.
जुन्नरमधील विधानसभा निवडणूक अटीतटीची झाली या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट व शरदचंद्र पवार गटाचे दोन तगडे उमेदवार समोर उभे असताना देखील अपक्ष निवडणूक लढलेले शरद सोनवणे यांनी विजय खेचून आणला.
जुन्नर तालुक्यामध्ये गावोगावी शरद सोनवणे यांचे जल्लोषात स्वागत होत असताना देखील शरद सोनवणे हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले. दरम्यान शरद सोनवणे यांना तातडीने मुंबईला बोलावणे आल्याने जुन्नरकरांच्या भुवया सध्या उंचावल्या आहेत तालुक्याला मंत्रिपद मिळावे अशी मागणी येथील सोनवणे यांच्या समर्थकांनी केली आहे.





