पुणे जिल्हा : वळसे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची तोफ धडाडणार

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात लोकसभेचा नारळ फोडणार
मंचर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राजकीय साथ देण्याचे सोडून आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा विद्यमान सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत गेल्याने सर्वांना राजकीय धक्का बसला. या राजकीय उलथापालथनंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात राजकीय जाहीर सभा २१ फेब्रुवारीस मंचर येथे घेणार असल्याचे जाहीर केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
दिलीप वळसे पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या आंबेगाव मतदार संघात शरद पवार वळसे पाटलांसदर्भात काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात भूकंप होऊन दोन गट पडले होते. त्यात शरद पवार गट आणि अजित पवार गट त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी विभागली गेली आहे.
त्यात आंबेगावचे आमदार आणि शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांच्या सोबत जाऊन सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे शरद पवारांना मोठा धक्का बसला होता. मात्र, आता दिलीप वळसे पाटील यांच्याच बालेकिल्ल्यात शरद पवार हे सभा घेणार असल्याने आंबेगावचे राजकारण तापू लागले आहे. येत्या २१ फेब्रुवारी रोजी मंचर येथे शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे, अशी.माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते देवदत्त निकम यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार यांची पहिल्यांदाच सभा होणार आहे. शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सभेसाठी तयारी चालवली आहे. शरद पवार हे आंबेगाव तालुक्यातून या सभांची सुरुवात करणार होते. मात्र, काही कारणामुळे ती लांबली. आता मात्र सभा घ्यायचे निश्चित केल्याने राजकारण तापू लागले आहे.
एकेकाळी शरद पवार यांचे मानस पूत्र म्हणून ओळख असलेले सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दल शरद पवार काय भाष्य करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून देखील या मतदार संघावर दावा केला जात असून त्यांनी अनेकदा जाहीर देखील केले आहे. तसेच विधानसभेसाठी देखील शरद पवार यांनी वळसे पाटील यांच्या विरोधातील चेहेरा शोधला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दिलीप वळसे पाटील व अजित पवार यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे.





