पुणे जिल्हा: काटेवाडीतील संपर्क दौऱ्यात शरद पवारांची संचालक मंडळावर सडकून टीका

गोकुळ टांकसाळे
काटेवाडी : कालची लोकसभेची निवडणूक होती ती देशाची निवडणूक होती आत्ता जी निवडणूक होणार आहे ती श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची ही तुमच्या संसाराची निवडणूक आहे व ही निवडणूक संसाराची असल्याने त्यात लक्ष घालावेच लागेल कारण काही नेते मंडळींनी कारखानदारी आपल्या हातात ठेवली आहे.
गेली सहा वर्ष छत्रपती साखर कारखान्यावरील सभासदांना इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत टणामागे सातशे ते आठशे रुपये दर कमी मिळत आहे. हा कारखाना आपला आहे म्हणून लोक संस्था व कारखान्याचा विचार करत आहेत. मात्र यावर शरद पवार यांनी आत्ता गप्प बसायचे का? दुरुस्ती करावीच लागेल यासाठी आपल्या सर्वांना एकत्र यावे लागेल, असे आवाहन शरद पवारांनी यावेळी केले.
श्री छत्रपती साखर कारखाना हा जुन्या लोकांनी उभा केला त्यावेळी हा साखर कारखाना एक नंबरचा कारखाना म्हणून मानला जात होता. त्यानंतर या कारखान्याचे एक नंबरचे नाव कुठे गेले कळत नाही. म्हणून या कारखान्याची दुरुस्ती करायची असेल तर आपल्या सर्वांना एकत्र यावे लागेल. लोकसभा निवडणूक झाली आहे इथून पुढील काळातील प्रत्येक निवडणूक लढवताना योग्य प्रकारे निर्णय घेऊन योग्य प्रकारे मतदान करून जनतेच्या हिताचे समाजकारण करत असताना तुमची मात्र साथ हवी आहे.
काटेवाडी (ता. बारामती) येथे संपर्क दौऱ्यानिमित्त माजी कृषिमंत्री शरद पवार आले असता त्यांनी समोरील बसलेल्या नागरिकांना पाहून नेते दिसत नाहीत, कुठे गेले कळत नाही, यावर नागरिकांमधूनच आवाज आला की मलिदा गॅंग, कॉन्ट्रॅक्टर, लाभार्थी बाजूला राहिले आहेत. यावेळी शरद पवार यांनी सांगितले की, जनता आमच्याबरोबर आहे. परंतु ज्या ठिकाणी मलिदा गँगचा विषय असेल मग तो कोणाचाही असो त्याला त्याची जागा त्या ठिकाणी दाखवून दिली जाईल.
त्यासाठी येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्ही सर्वजण जनतेला जागृत करा, तुमचे नियोजन तुमच्या पद्धतीने करून जनतेला जागृत केले तरच तुमच्या या जागृतीच्या जोरावर आपण चित्र बदलू शकतो आणि ते चित्र आपल्याला सर्वांना मिळून बदलायचे आहे. माझा प्रयत्न आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात बदल करायचाय. लोकांना सुखी करायचे यासाठी आपण सर्वांनी मिळून स्वच्छ कामाची सुरुवात करून खऱ्या अर्थाने जे कष्टाने मिळेल तेच घेतले पाहिजे.
काही ठिकाणी आर्थिक देवाणघेवाण बाबत कानावर आले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करा व कामाला लागा अशाही सूचना यावेळी दिल्या. महिलांनी देखील चांगल्या पद्धतीने मतदान केले. यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. त्यामुळे तुमची साथ महत्त्वाची आहे. तुम्ही पुढील पावले टाका मी कायम तुमच्याबरोबर आहे, असेही शरद पवार म्हणाले.
देशामध्ये लोकशाही आहे अनेक देशांमध्ये हुकूमशाही आहे. मात्र आपल्या देशामध्ये हुकूमशाहीच्या पद्धतीने कोणी जाण्याचा विचार करीत असेल तर आम्हा सर्वांपेक्षा तुम्ही लोक जनता आमच्यापेक्षाही शहाणे आहात तुम्ही बरोबर ज्यांना जागा दाखवायचे काम करता. म्हणूनच देशांमध्ये लोकशाही टिकून आहे.
हुकूमशाहीकडे देश कधी जाऊ दिला नाही, त्याचे श्रेय तुम्हा सर्वांना आहे. काटेवाडी गावामध्ये सभेच्या ठिकाणी फलक लागले होते. परंतु यावेळी नाव न घेता शरद पवार यांनी भाष्य केले की मला कोणीतरी सांगितले की आजच सकाळी हे फलक लागले आहेत. परंतु कितीही फलक लावले तरी जनतेचे मत महत्त्वाचे आहे व जनता आमच्याबरोबर असल्याने जनतेने आम्हाला मतदान दिले आहे त्यामुळे फलक कितीही लावा जनतेने मते कोणाला दिले हे महत्त्वाचे आहे.
बारामतीकरांनी मला साथ दिली – शरद पवार
सध्याची राज्यसभेची निवडणूक ही फार महत्त्वाची होती देशांमध्ये निवडणुकी संदर्भात मी कुठेही गेलो तरी मला विचारले जात होते की बारामतीचे काय होणार? अशाप्रकारे विचारत होते परंतु बारामतीकर माझी साथ कधीही सोडणार नाहीत, याची खात्री मला कायम आहे आणि तसेच घडले. सर्वच मतदारसंघांमध्ये भरघोस मतदान झाल्याने खासदार सुप्रिया सुळे यांचा विजय झाला.
या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी पंतप्रधान राज्यांमध्ये आले असता त्यांनी 18 ठिकाणी सभा घेतल्या त्यापैकी 18 च्या 18 ठिकाणी प्रत्येक वेळी फक्त माझे (शरद पवारांचे) नाव घेत होते ही काही साधी गोष्ट आहे का? त्यामुळे जनतेने त्यांच्या मनातील ठरल्याप्रमाणे त्यांनी काम केले.
कण्हेरी येथील मंदिरामध्ये प्रत्येक निवडणुकीच्या वेळी प्रचाराचा नारळ याच ठिकाणी फोडला जात असल्याने नारळ फोडल्यानंतर मी संपूर्ण देशामध्ये फिरलो. मात्र बारामतीकरांनी मला साथ दिली. माझा बारामतीकरांवर विश्वास आहे व त्यामुळेच खासदार सुप्रिया सुळे यांचा विजय मोठ्या मताधिक्याने झाला आहे.





