पुणे जिल्हा : चिंबळीत भीषण पाणीटंचाई

दिवसाआड पाणीपुरवठा पण तोही दूषितच
चिंबळी : खेड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या दक्षिण भागातील चिंबळी येथे पिण्याच्या पाण्याची भीषणटंचाई जाणवत असून दिवसाआड होणारा पाणीपुरवठा हा कमीदाबाने आणि काहीकाळच होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
चिंबळी येथे गेल्या अनेक वर्षांपासून गावठाण हद्दीत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करून इंद्रायणी नदीकाठच्या विहीचे पाणी आणून सार्वजनिक नळजोड करून पाणीपुरवठा करण्यात येतो पण हे विहिरीत कमी प्रमाणात येत असल्याने सार्वजनिक नळाद्वारे दिवसआड येत आहे. इंद्रायणी नदीपात्रात मोठ्याप्रमाणात जलपर्णी असल्याने हे पाणी हिरवेगार असल्यामुळे पिण्यालायक नसून या हिरवेगार पाण्यामुळे रोगराई निर्माण होऊन विविध प्रकारे आजार वाढत आहेत.
गावठाण हद्दीतील सार्वजनिक विहिरीचे पाणी काही भागातच येते तर काही भागांत येत नाही. गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा व्हावा म्हणून ग्रामपंचायती मार्फत विहिरीत पाणी टँकर टाकले जाते; परंतु हे पिण्याचे पाणी मोजक्याच ठिकाणी जात असून गावठाण हद्दीतील काही भागात हे पिण्याचे पाणी जात नसल्याने नागरिकांना विकतच्या पाण्यावर खर्च करावा लागत आहे.
आठवड्यात समस्या सोडविणार
ज्या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या असेल ती येत्या आठवड्याभारात सोडविण्यात येईल, असे आश्वासन ग्रामविकास अधिकारी तुषार साळुंखे, उपसरपंच राहुल चव्हाण, सदस्य, बाजार समितीचे संचालक अनुराग जैद यांनी दिले.





