पुणे जिल्हा : मराठा आरक्षणासाठी ज्येष्ठाची आत्महत्या

मुलाला अनुकंपावर नोकरी मिळत नसल्याने “इंद्रायणी’त मारली उडी
आळंदी – मराठा आरक्षणासाठी आणखी एक बळी गेल्याचे समोर आले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने आणि मुलाला अनुकंपावर नोकरी मिळेना. या नैराश्यातून 60 वर्षीय व्यक्तीने आळंदी (ता. खेड) येथील इंद्रायणी नदीत आत्महत्या केली.
आळंदी येथील जुन्या बंधाऱ्यात व्यंकट ढोपरे (वय 60) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. व्यंकट ढोपरे हे सध्या नऱ्हे आंबेगाव (पुणे) येथे वास्तव्यास होते. ते मूळचे लातूर जिल्ह्यातील उंबरदरा गावचे. ते तेथील माजी सरपंच होते. व्यंकट ढोपरे यांनी वृद्धापकाळात टोकाचे पाऊल उचलले आहे. पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदीत त्यांचा शनिवारी (दि. 28) मृतदेह आढळला. नऱ्हे आंबेगाव येथून शुक्रवारी (दि. 27) ते दर्शनासाठी आळंदीत आले होते. सकाळी अकराच्या सुमारास ते तिथून निघाले.
दरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांना घरातच एक चिठ्ठी सापडली. त्यातून त्यांनी आरक्षण मिळत नसल्याने टोकाच पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, चिठ्ठी मिळताच कुटुंबीयांनी आळंदीकडे धाव घेत पोलिसांना माहिती दिली. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन दलास पाचारण करण्यात आले. व शोध मोहीम सुरू झाली. जुन्या बंधाऱ्याच्या नदी पात्रात आळंदी नगरपरिषदेच्या आग्निशमन दल, पिंपरी चिंचवड अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापना मार्फत बोटीच्या सहाय्याने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत त्यांची शोध मोहीम सुरू होती.
शनिवारी सकाळी पुन्हा एकदा बंधाऱ्यात शोध मोहिमेचे काम सुरू झाले. त्यावेळी दुपारी एक सव्वाच्या दरम्यान जुन्या बंधाऱ्याच्या पाण्यात त्यांचा हात बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. स्वतः चे हात बांधून त्यांनी बंधाऱ्यात आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. ही चिठ्ठी पाहून कुटुंबीयांना धक्का बसला आणि त्यांनी भोसरीत राहणाऱ्या जावयास याबाबत कळवले. तेव्हा आळंदीत त्यांचा शोध घेताना बंधाऱ्यालगत त्यांची पिशवी, मोबाइल, गळ्यातील माळ, बूट आणि ज्ञानेश्वरीमधील काही कागद आढळली. दरम्यान, त्यांना पोहायला येत असल्याने त्यांनी स्वतःच स्वतःचे हात बांधून इंद्रायणी नदीत उडी घेतल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. शवविच्छेदन अहवालात यात आणखी स्पष्टता येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे की…
मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. मी सरपंच असल्यापासून प्रयत्न करतो. तरी सरकार याला गांभीर्याने घेत नाही. तसेच 2012 पासून माझ्या मुलाला अनुकंपावर नोकरी दिली जात नाही. मुलाच्या आईच्या वडिलांच्या जागी त्याला नोकरी मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. पण प्रशासन आम्हाला न्याय देत नाहीत. याच नैराश्यातून मी आत्महत्या करीत आहे.





