Pune District : सर्पांना वाचविणे हे निसर्गरक्षणच – सुशिल विभुते

सारोळा – धामण हा शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे. तो शेतातले उंदीर खातो आणि पिकांचे नुकसान होऊ देत नाही. त्यामुळे सापांना वाचविणे हे निसर्गरक्षणाचेच काम आहे, असे प्रतिपादन पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्प रक्षक असोसिएशनचे अध्यक्ष सुशिल विभुते यांनी केले. जागतिक सर्प दिनानिमित्त पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्प रक्षक असोसिएशनच्या वतीने नसरापूर येथे भव्य सर्प जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुशिल विभुते बोलत होते.
विभुते पुढे म्हणाले, मात्र, नाग व मण्यार यांच्या विषामध्ये न्यूरोटॉक्सिन्स असतात, जे मज्जासंस्थेला घातक ठरतात. विष शरीरात गेल्यावर श्वसन क्रिया बंद होऊ शकते आणि मृत्यू होऊ शकतो. दुसरीकडे, घोणस व फुरसे यांच्या विषात हिमोटॉक्सिन्स असतात, जे रक्ताच्या गाठी तयार करतात, रक्तस्राव करतात, ऊतकं नष्ट करतात आणि गंभीर इजा करतात.
शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थ, सर्पमित्र व काही कर्मचारी अशा शेकडो नागरिकांनी कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या वेळी सर्पमित्रांनी सर्पांविषयी पसरलेल्या भीती, गैरसमज, अंधश्रद्धा दूर करत शास्त्रीय व उपयुक्त माहिती दिली. उपाध्यक्ष शंकर वाडकर, सागर सूर्यवंशी, विशाल शिंदे, रघुनाथ वाडकर, विनायक मोहिते, विलास धोंगडे, श्रीकांत खेडकर, अक्षय कदम, सनी खडके, संतोष पाटील, शेतकरी प्रज्योत कदम व अनिकेत शेटे उपस्थित होते.
बिग फोर…
महाराष्ट्रात सर्वाधिक आढळणारे चार विषारी साप म्हणजे नाग, घोणस, मण्यार व फुरसे. ही चौकडी “बिग फोर” म्हणून ओळखली जाते आणि बहुतेक सर्पदंशाच्या घटनांना हीच जबाबदार असतात. सर्पांचे विष औषधनिर्मितीमध्ये उपयोगी पडते. आज जी प्रतिविषे वापरली जातात, ती देखील सापांच्या विषातूनच बनवलेली आहेत. काही औषधांतही नाग व फुरशाच्या विषाचा वापर होतो. त्यामुळे “सापांना मारू नका, त्यांना वाचवा” हा संदेश सर्वांना द्या, असे आवाहनही सुशिल विभुते यांनी वेळी केले.





