Pune District : सासवड पोलिसांचा कायद्याचा खेळ?

ड्रंक अँड ड्राइव्हप्रकरणी पोलिसावर गुन्हा;मात्र कारवाईबाबत प्रश्नचिन्ह
सामान्य नागरिकाच्या मृत्यूनंतरही पोलीस काद्याच्या पळवाट काढण्यात मग्न
दिवे – पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावाजवळ एका मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचार्याच्या कारने दुचाकीवरून जाणार्या व्यक्तीला जोरदार धडक दिली होती. घटनेनंतर त्यास मदत करण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढला. तसेच कोणताही पुरावा राहू नये यासाठी पोलीस अधिकार्यांनी कोणतीही वैद्यकीय तपासणी केली नाही. तसेच कारही दुरुस्त करून घेतल्याने कायद्याचा दुरुपयोग कसा करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. घटनेच्या तब्बल आठ दिवसानंतर संबंधित पोलीस कर्मचार्यावर गुन्हा दाखल केला; मात्र कारवाईबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सासवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार योगेश गरुड याने बुधवारी (दि. 2) सोनोरीजवळ एका हॉटेलसमोर चारचाकी गाडीत बसून सहकारी असलेल्या होमगार्ड जवानसोबत दारू प्राशन केली. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत कार चालवून सासवडकडे येताना वाटेत एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर काही अंतर गाडीने फरफटत नेले. यामध्ये दुचाकीवर असलेले संजय रामचंद्र मोरे (रा. सोनोरी, ता. पुरंदर) यांच्या डोक्याला जोरदार मार लागून गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्याऐवजी गरुड याने तेथून पलायन केले. याबाबत कुठेही वाच्यता करू नकोस असेही सोबत असलेल्या होमगार्ड जवानास बजावले.
याबाबत रस्त्याने जाणार्या काही व्यक्तींनी मोरे यांच्या कुटुंबीयांना माहिती दिल्यानंतर प्रथम सासवड येथील धन्वंतरी रुग्णालयात दाखल केले. मात्र, जखम गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी पुणे येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांना कोंढवा येथील खासगी रुग्णालयात तातडीने हलविण्यात आले. दरम्यान, अपघाताची घटना घडल्यानंतर पोलीस कर्मचारी योगेश गरुड याने इतर पोलीस कर्मचार्यांना माहिती दिली होती. त्याचवेळी इतर कोतेही वाच्यता करू नये याबाबत स्वतः पोलीस अधिकार्यांनी दक्षता घेतली होती.
अपघात झाल्यानंतर योगेश गरुड याची स्विफ्ट कार (एमएच 12 जीएम 5632) तातडीने पोलीस ठाण्यात जमा करून गरुड याची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक होते. मात्र, याबाबत अधिकार्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. केवळ औपचारीकता म्हणून जखमीच्या पत्नीचा तात्पुरता जबाब घेतला. त्यामुळे याप्रकरणात पूर्णपणे हयगय झाल्याचे दिसून आले आहे.
कारवाई न करता का दिली सूट?
जखमी मोरे यांच्यावर पुणे येथे जवळपास आठ दिवस उपचार सुरू असताना मिळालेल्या वेळेत पोलीस कर्मचार्याला कायद्याच्या पळवाटांचा पूर्णपणे वापर करून घेता आला. तेवढ्या वेळेत गाडी दुरुस्त करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता गुन्हा दाखल झाला असला तरी भविष्यात पुरावेच उपलब्ध झाले नाही तर काय करणार? असा प्रश्न मोरे कुटुंबीयांसमोर उभा राहणार आहे. त्यामुळे या प्रकरणात वाहतूक पोलीस कर्मचारी योगेश गरुड यास मदत करणारे पोलीस निरीक्षक आणि घटनेची माहिती असतानाही कोणतीही कारवाई न करता त्यास सूट देणारे भोर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचावर कारवाई होणे अपेक्षित आहे.
मोठा गुन्हा करूनही मोकाट का?
रस्त्याने ट्रिपलसीट, हेल्मेट न वापरणे, गाड्यांचा मोठ्याने आवाज काढणे, कागदपत्रांची पूर्तता नसणे यावरून पोलीस कारवाई करतात. मग स्वतः वाहतुकीचे नियम इतरांना सांगणारा पोलीस कर्मचारी मोठा गुन्हा करूनही मोकाट का ? असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.





