पुणे जिल्हा : सराईत गुन्हेगार जेरबंद, साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

लोणी काळभोर – कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीत तीन लाख रुपयांचे सोने चोरून नेणार्या व चार महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांंनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व दोन दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत.
याप्रकरणी विजय लक्ष्मण गलांडे (वय 31, रा. तळेरानवाडी, केसनंद; मूळ गाव नरसिंहपूर, ता. इंदापूर) याला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात सचिन कांतीलाल काळभोर (वय. 45, रा. थेऊर फाटा, कुंजीरवाडी) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. 12 जून रोजी घराला कुलूप लावून सचिन काळभोर देवदर्शना करिता गेले होते.
यावेळी अज्ञात इसमाने घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश करुन 43 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. लोणी काळभोर पोलिसांचा तपास सुरू असताना तपास पथकातील अंमलदार कुदळे व पाटील यांना या संदर्भात माहिती मिळाली होती. त्यानुसार विजय गलांडे याला थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमी जवळून ताब्यात घेण्यात आले.
त्याची चौकशी केली असता लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून सोन्याचे दागिने व दोन दुचाकी असा एकून तीन लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.





