आज नीरा स्नान ः सराटी गावात पालखी सोहळा विसावला इंदापूर – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्याच्या हद्दीच्या शेवटच्या गावी, नीरा नदीकाठी सराटी तालुका इंदापूर येथे हरिनामाच्या गजरात सोमवारी (30 जून) रात्री उशिरा दाखल झाला. इंदापूर शहरातील गोल रिंगण व मुक्काम संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आटोपल्यानंतर सकाळच्या प्रहरी पालखीतील पादुकांचे पूजन करून, सराटी गावाकडे पालखी सोहळा मार्गस्थ करण्यात आला. वडापुरी येथील विश्रांती आटपून, बावडा येथे संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दुपारच्या मुक्कामासाठी ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. बावडा येथील दुपारचा मुक्काम संपवून पालखी सोहळा सराटीकडे रात्रीच्या मुक्कामासाठी सायंकाळी रवाना झाला. बावडा गावच्या वेशीवर पालखी सोहळा दुपारी पोहचला. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी पालखीचे जोरदार व उत्साही वातावरणात स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच, उपसरपंच यांनी स्वागत केले. बावडा गावाला पूर्वी ज्या ठिकाणी गावची वेस होती त्या ठिकाणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व नीरा भीमा कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांचे प्रयत्नातून नुकतीच वेस बांधण्यात आली आहे. या वेशीतून बावडा ग्रामस्थांनी पालखी खांद्यावर घेऊन बाजारतळावरती उभारण्यात आलेल्या भव्य शामियानामध्ये आणली. गावामध्ये पालखी सोहळ्यानिमित्त पाटील यांचे रत्नाई निवासस्थानी हजारो वारकर्यांना अन्नदान करण्यात आले. याठिकाणी पालखी सोहळा प्रमुखांचा व विश्वस्तांचा नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक उदयसिंह पाटील, विकास पाटील, माजी सरपंच किरण पाटील आदींनी सत्कार केला. बावडा येथील दुपारचा विसावा संपवून सायंकाळी पालखी सोहळ्याने सराटीकडे प्रस्थान ठेवले. यावेळी ग्रामस्थांनी वाजत-गाजत गावच्या वेशीपर्यंत जात बावडेकरांनी पालखीस निरोप दिला. विठ्ठलवाडी, वडापुरी, सुरवड, वकीलवस्ती, बावडा या गावाहून सायंकाळी इंदापूर ते सराटी असा 23 ते 24 किलोमीटर अंतर हरिनामाच्या अखंड गजरात पायी वाटचाल करून सराटी गावात मुक्कामासाठी दाखल झाला. सराटी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीत विसावला. या दरम्यान सर्व ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने पालखी थांबणार्या ठिकाणी रांगोळ्यांनी सजावट केली. तसेच ठीक ठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. संत तुकाराम महाराज पालखी विश्वस्त यांचाही सन्मान या गावांमध्ये करण्यात आला. सराटी गावात पालखी सोहळा आल्यानंतर गावाच्या वेशीवर गावातील ग्रामस्थ रथातून पालखी खांद्यावर घेऊन मुक्काम स्थळापर्यंत टाळ मृदंगाच्या निनादांमध्ये आणल्यानंतर सर्व दिंड्यांचे विणेकरी, झेंडेकरी, तुळशीवृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला, पखावजवादक, चोपदार टाळकरी तसेच पुणे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, हनुमंत कोकाटे, उपसरपंच संतोष कोकाटे, सरपंच प्रतिनिधी समीर तांबोळी, काकासाहेब जगदाळे, रोहित जगदाळे, सुधीर कोकाटे, ज्ञानदेव कोकाटे, बापूसाहेब कोकाटे, विक्रम कोकाटे, रघुनाथ कोकाटे, बाबासाहेब कोकाटे, राजेंद्र कुरळे, सुरेश कोकाटे, अतुल भोसले, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा अध्यक्ष जालिंदर मोरे, सोहळा प्रमुख दिलीप मोरे, वैभव मोरे, गणेश मोरे, विश्वस्त विक्रम मोरे, नंदकुमार मोरे, माजी अध्यक्ष बापूसाहेब देहूकर, पुरुषोत्तम मोरे व इतर विश्वस्त, इंदापूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, सराटी गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये भव्य अशी महाआरती संपन्न झाली. मंगळवारी (1 जुलै) सकाळी संत तुकोबारायांचा पालखी सोहळा नीरा स्नानाने सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार आहे. बावडा गावी उत्स्फूर्त स्वागत ग्रामपंचायत बावडा यांच्या वतीने दर्शनमंडप तसेच आकर्षक रांगोळ्या यांची सजावट करण्यात आली. श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बावडा यांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी, राम, सीता, लक्ष्मण या वेशभूषा तसेच पताका घेऊन विद्यार्थी तुळशी वृंदावन घेऊन विद्यार्थिनी पालखीच्या स्वागतासाठी उपस्थित होते. ऋवेदा आयुर्वेदिक क्लिनिक बावडा डॉ. ऋचा गारटकर व डॉ. ऋषीकेश गारटकर यांच्यावतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दूधगंगा सहकारी संघ यांच्या वतीने मोफत सुगंधी दूध वाटप करण्यात आले