Pune District : भात रोपे टाकण्याची कामे पावसामुळे अर्धवट

मंचर – चालू वर्षी मे महिन्यात अचानक पावसाने सुरुवात केल्याने आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील अनेक गावातील शेतकऱ्यांची शेताची राब भाजणी व भात रोपे टाकण्याची कामे अर्धवट झाली आहे. त्यामुळे भविष्यात भात पिकाच्या उत्पादनावर परिणाम होईल,अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. ज्या शेतकऱ्यांनी रोपे टाकली आहेत. त्यांची दोन ते तीन आठवड्याची भात रोपे झाली आहे.
पाऊस पडत असल्याने भात रोपांची वाढ योग्य होत असून, भात लागण लवकर होईन.अशी आशा शेतकऱ्यांना आहे. या वर्षी पावसाने लवकर म्हणजे मे महिन्यातच चांगली हजेरी लावली होती.
लवकर सुरू झालेल्या पावसामुळे ज्या शेतकऱ्यांनी रोपे टाकली आहेत. त्यांची भातरोपांची चांगली उगवण झाली. उगवणीनंतर वाढीसाठी सध्या आवश्यक पाऊस पडत आहे.त्यामुळे भात रोपांची वाढ चांगली होत असून,मध्ये मध्ये पडत असल्याने उन्हामुळे भातरोपे चांगली वाढत आहेत.
यंदा अचानक मे महिन्यातच पावसाला सुरुवात झाल्याने भात बियाणाची पेरणी करण्यात अडचण आली. परंतु सध्या पोषक हवामान असल्याने रोपांची वाढ योग्य होईल असे वाटते.
– वामन लोहकरे, प्रगतशील शेतकरी, निगडाळे.





