Pune District : मुळशीत महसूलचे काम रामभरोसे

अधिकार्यांची नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे ः नागरिक हैराण
पौड – मुळशी तालुक्यातील मागील तहसीलदार रणजित भोसले यांच्या निलंबनानंतर 30 जून रोजी महिला तहसीलदार मिनल भामरे यांची नियुक्ती झाली होती; मात्र केवळ दुसर्याच दिवशी त्यांना पदभार न स्वीकारण्याच्या सूचना दिल्या गेल्याने त्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. त्यामुळे तालुक्याचा कारभार ‘राम भरोसे’ सुरू आहे, आणि याचा थेट फटका नागरिकांच्या दैनंदिन कामांवर पडत आहे.
मुळशी तहसील कार्यालय मधील प्रभारी तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडून तहसील विभागाचा कारभार योग्य पद्धतीने सुरळीत ठेवण्यास असमर्थ होताना दिसत आहे. मुळशीतील नागरिकांची रखडलेल्या कामामुळे नागरिकांचा रोष वाढताना दिसत आहे. काही दिवसापूर्वी दैनिक प्रभातच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे प्रयत्न करण्यात आला; परंतु झोपलेले माणसाला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेणार्याला जाग करता येत नाही, अशी परिस्थिती मुळशी तहसील कार्यालयाची झाली आहे. याबाबत प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले यांनी तहसीलदार देशमुख यांना कामांचा निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असूनही रखडलेली कामे झालेली दिसत नाही.
राज्यात सर्वाधिक जमीन वादाचे प्रकरणे मुळशी तहसीलमध्ये असल्याचे समोर आले आहे. याशिवाय रिंग रोड प्रकल्प, हिल स्टेशन मंजुरी व औद्योगिक झोनमुळे जमीन व्यवहार झपाट्याने वाढले आहेत. मात्र तहसीलदार नसल्याने जमीन व्यवहार, भोगवटाधिकार, दाखले, फेरफार अशा महत्त्वाच्या कामांचा खोळंबा होत आहे
. भोगवटा वर्ग 2 मधील वतन जमिनीच्या व्यवहारांसाठी तहसीलदारांचा थम आवश्यक आहे. थम शिवाय 7/12 उतारे खुले होत नाहीत आणि खरेदीखत नोंदणीस अडचण येते अशी अनेक कामे रखडली आहे
मुळशीतील स्वराज्य पक्ष चे तालुका अध्यक्ष राजू फाले व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख सचिन खैरे यांनी मुळशीला तहसीलदार पूर्ण वेळ मिळावा म्हणून याबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊनही मुळशी तालुक्यातील पूर्ण वेळ तहसीलदार नियुक्त होत नसल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
मुळशी येथील 7/12 थम ओपन करताना गावे दिसत नव्हती. त्याबाबत टेक्निकल काम सुरू आहे. ते झाल्यावर थंब ओपन केले जाईल.
-जयराज देशमुख, प्रभारी तहसीलदार मुळशी





