पुणे जिल्हा: महसूल सेवकांचे हवेलीत आंदोलन

सोरतापवाडी – महसूल सेवक (कोतवाल) यांना चर्तुथ श्रेणी मिळावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेच्या वतीने नागपूर येथील संविधान चौकात धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हवेली तालुक्यातील महसूल सेवक संघटनेने काम बंद आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
दरम्यान, हवेली तालुक्यात महसूल सेवकांनी काम बंद आंदोलन केल्याने महसूलची कामे, पीक नोंद, शासकीय कामे ठप्प झाली आहेत. नागपूर येथे (दि.१३) पासून महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेच्या वतीने राज्याचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
गेल्या १३ दिवसांपासून शासनाचे अधिकारी आंदोलनस्थळी फिरकले नाहीत. साखळी उपोषण करून राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या.
दरम्यान, नागपूर येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हवेली तालुक्यातील महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेच्या वतीने महसूल सेवकांनी लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, हवेलीचे तहसीलदार किरण सूर्यवंशी यांनी निवेदन दिले. यावेळी संतोष कुटे, सुरेश शेलार, देवा मुंडुळे, धनंजय कदम, दशरथ वगरे, कांताराम लोंढे, शिवाजी माकर यांच्यासह हवेली तालुक्यातील महसूल सेवक उपस्थित होते.





