पुणे जिल्हा : बारामतीत दुचाकी रॅलीला प्रतिसाद

युगेंद्र पवार यांच्या प्रचारात तरूणाई उतरली
बारामती – बारामती विधानसभा मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला असून युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आज बारामती शहरातून दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे व योगेंद्र पवार यांनी काढलेल्या दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो तरुण तरुणी दुचाकी रॅलीत सहभागी झाले होते.
संपूर्ण राज्याचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघाकडे लागून राहिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात ही लढाई होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर अजित पवार यांच्या विरोधात प्रथमच तगडा उमेदवार शरद पवार यांनी दिल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे विशेष लक्ष आहे. बारामती शहर व तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जोरदार प्रचार केला जात आहे.
शहरात सलग चार दिवस पायी रॅली काढल्यानंतर शनिवार (दि.१६) दुचाकी रॅली काढण्यात आली. शहरातील सिनेमा रोड, भिगवन चौक, भिगवन रोड, एमआयडीसी चौक तसेच सूर्यनगरीतून ही दुचाकी रॅली गेली. युगेंद्र पवार तसेच रेवती सुळे यांनी हात उंचावत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
बारामती एमआयडीसी परिसरात शर्मिला पवार यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. प्रचाराला अवघे दोन दिवस उरले असून शहर व तालुक्यातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवार तसेच त्यांच्या कुटुंबीयांकडून व कार्यकर्त्यांकडून प्रयत्न होत आहे. तालुक्यातील गावगाड्यासह वाड्या- वस्त्यांवर देखील उमेदवार पोहोचत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत रंगत भरली आहे.





