पुणे जिल्हा : भोरच्या मतदारांचा प्रतिसाद विकासाला

किरण दगडे : पिरंगुटमध्ये मतदारांशी संवाद
पिरंगुट : गावांसह तालुक्याच्या विकासाकडे दुर्लक्ष केलेल्या लोकप्रतिनिधींना मतपेटीतून उत्तर द्यायची वेळ आली आहे. जनतेचा मिळत असलेला उत्स्फुर्त प्रतिसाद हा विकासाला असून, मतदारांनी भोर, राजगड, मुळशीचा विकासाची संधी द्यावी, असे आवाहन भोर विधानसभेतील अपक्ष उमेदवार किरण दगडे पाटील यांनी नागरिकांना केले.
दगडे म्हणाले की, मुळशी तालुका शहरालगत असूनही आजही रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्य या प्राथमिक गरजांची वाणवा आहे. भूगाव, पिरंगुट, घोटवडे फाटा आणि पौड येथील वाहतुक कोंडी नित्याचीच बनली आहे. दिघी पोर्ट बंदर ते पुणे या कोलाड महामार्गाची दुर्दशाच आहे. कारण, चारपदरी असलेला महामार्ग आज तीनपदरीच दिसतो. त्यातही कामाचा दर्जा शंकास्पद आहे. पौड येथील ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था झालेली आहे.
आजही रूग्णाला उपचार द्यायचे असेल तर शहरातील रूग्णालयातच जावे लागते. शहरालगतच्या गावांना वारंवार विजेचा लपंडावाला सामोरे जावे लागते. मग खेडेगावात काय अवस्था असेल, अशी अवस्था मुळशी तालुक्याची असेल तर मागील अनेक वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या लोकप्रतिनिधींनी केले काय? असा संतप्त सवाल दगडे यांनी उपस्थित केला. त्यामुळे मुळशी तालुक्यामधील सगळ्या समस्या, प्रश्न सोडविण्याला प्रथम प्राधान्य असेल, असे आश्वासन दगडे यांनी मुळशी तालुक्यातील प्रचाराच्या बैठकीमध्ये नागरिकांना दिले.
दरम्यान, रविवारी (दि. १७) मुळशीतील घोटवडे फाटा येथे संध्याकाळी ५ वाजता प्रचार सभेचे आयोजन केलेले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन किरण दगडे यांनी केले





