आळंदी : भाविकांना यंदा माउलींचा रथोत्सव हा वैभवी आणि प्राचीन असलेल्या १५० वर्षे जुना लाकडी रथ पाहता आला. तब्बल २३ फूट उंच आणि अंदाजे १ हजार २०० किलो वजन असलेल्या या रथातून माउलींचा आळंदी शहरातून रथोत्सव पार पडला. मूळ लाकडी रथातून यंदाचा रथोत्सव पाहण्याचे साक्षीदार भाविक ठरले. ही अनोखी पर्वणी होती. इ.स. १८७३ मध्ये श्रीगुरू नरसिंह सरस्वतीस्वामी महाराज आळंदीला आले. इ.स. १८८६ ला त्यांनी आळंदीत समाधी घेतली. आपल्या ११ वर्षे आळंदीतील कार्यकाळात त्यांनी माऊलींच्या वैभवात भर टाकण्यात मोठे योगदान दिले. माउलींच्या कार्तिकी उत्सवात रथोत्सव त्यांनी सुरू केला असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी सुरेख नक्षीकाम असलेला शिसम लाकडाचा भव्य रथ त्यांनी माऊलींसाठी बनविला. त्यातून पुढील काही दशके रथोत्सव या रथातून सुरू होता. मात्र, तत्कालीन रस्त्यांची अवस्था आणि रथाची भव्यता पाहता पुढे देवस्थानने हजेरी श्रीमारुती मंदिर चौकात भव्य रथ उभारणी मंडप बांधला व त्यात हा रथ अनेक वर्षे ठेवण्यात आला. अलीकडे काही वर्षांपूर्वी तेथील मंडप पाडून हा रथ आळंदी- वडगाव रस्ता येथील विश्रांत वड या देवस्थानच्या बागेत भाविकांना पाहण्यासाठी संवर्धित करत ठेवण्यात आला होता. यंदाच्या कार्तिकी वारी सोहळ्यात रथोत्सवासाठी बाहेर काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. भाविकांना एक प्राचीन आगळीवेगळी रथोत्सवाची परंपरा पुन्हा एकदा या निमित्ताने पाहायला मिळाली. माऊलींचा चांदीचा मुखवटा भव्य रथात ठेवून गोपाळपुरा ते श्री माउली मंदिर, अशी ग्रामप्रदक्षिणा होत असते, याला रथोत्सव असे म्हणतात. दरवर्षी तो पंढरपूरला नेण्यात येणाऱ्या चांदीच्या रथातून होत असतो. यंदा तो पुरातन लाकडी रथातून झाला.