Pune District : परिंचे येथे रंगला नाथांचा शाही लग्न सोहळा

परिंचे : गगनचुंबी फटाक्यांची आतिषबाजीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत परिंचे (ता . पुरंदर) येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज व देवी जोगेश्वरी शाही लग्न सोहळा गावचे पाटील विक्रमसिंह हिम्मतराव जाधव यांच्या हस्ते विधीवत पूजा करून पारंपरिक पद्धतीने पार पडला. यावेळी सर्व मानकरी, सेवेकरी उपस्थित होते. यात्रा उत्सवानिमित्त मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट तसेच गगनचुंबी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती.
नाथ डोंगरावरील श्री काळभैरवनाथ यांच्या मुख्य स्थळी मानकरी समस्त दुधाळ मंडळींच्या हस्ते उत्सव मूर्तींना हळद लावून यात्रा उत्सवाला सुरुवात करण्यात आली. मंदिरा समोर रामोशी समाजाच्या वतीने हळदीचा मांडव टाकण्यात आला होता. सोमवारी (दि. 21) यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी देवाचे पुजारी राहुल गुरव व दिगंबर गुरव यांच्या हस्ते उत्सव मूर्तींना अभिषेक घालून महापूजा करण्यात आली. या दिवशी भाविकांनी देवाला स्नान घालण्याची परंपरा असल्याने सकाळपासून भाविकांनी मंदिरात देवाला जलाभिषेक घालण्यासाठी गर्दी केली होती.
संध्याकाळी साडेसहा वाजता मानकरी विक्रम सिंह जाधव (पाटील) यांच्या वाड्यातून पुष्पहार, मंडवळ्या, अक्षदा, पोशाख वाजत-गाजत मंदिरात आणल्या सायंकाळी सात वाजता ग्राम पुरोहित अनंत भोपळे यांनी पौरोहित्य करून काळभैरवनाथ व जोगेश्वरी यांचा मूर्तींना संपूर्ण पोशाख आणि अलंकार घालून माळी समाजाकडून आलेला मंडवळ्या बांधून अक्षदा वाटून मंगलाष्टका म्हणत पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळा पार पडला. देवाचे बारा सेवेकरी व मानकर्यांना हिम्मतराव जाधव (पाटील) कुटुंबीयांकडून सन्मानित करण्यात आले.
रात्री साडेनऊ वाजता छबिण्याला सुरवात झाली दुधाळ, वाघोले, नवले, घारमळकर यांचे मानाचे ढोल छबिण्यात उतरले होते. देवाच्या पालखीने निशाण, छत्री, अबदागीरी, दिवटी या सर्व लवाजम्यासह दोन मंदिर प्रदक्षिणा पूर्ण केल्या रात्री अकरा वाजता ढोल लेझीम खेळाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 15 गावांच्या पथकांनी सहभाग घेतला होता. पहाटे एक वाजता करते तुम्हाला मुजरा या लावण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.





