प्रशासनाचे दुर्लक्ष ः कुंडमळा अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये लोणी काळभोर – लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रामदरा येथे जाणारा व 1965 साली बांधलेला नवीन मुठा उजवा कालव्यावरील पूल आता पूर्णतः जीर्ण झाला असून, कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहे. दररोज सुमारे पाच हजार नागरिक, पर्यटक आणि भाविक या पुलावरून ये-जा करतात. त्यामुळे कुंडमळा अपघाताची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर रामदरा परिसर हिरवागार झाला आहे. पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातून हजारो भाविक, ट्रेकर्स आणि पर्यटक येथे गर्दी करत आहेत. धार्मिक महत्त्वाबरोबरच निसर्ग पर्यटनाचे केंद्र म्हणूनही रामदरा ओळखले जाते. कोरोना नंतर पर्यटन वाढले असतानाही या ठिकाणी आवश्यक त्या पायाभूत सुविधा नाहीत. सध्या पुणे महानगरपालिकेच्या पीएमपीएमएलच्या वतीने येथे बससेवा सुरू करण्यात आली आहे. एखादी बस घेऊन जर हा कुमकुवत पुल पडला तर प्रचंड जिवीतहानी होण्याची शक्यता आहे. फुरसुंगी रेल्वे स्थानकावर सुरू झालेल्या मालधक्क्या वरुन 25 – 30 टन माल वाहतूक करणा-या हायवा, डंपर गाड्या ही याच पूलावरून जातात. मात्र जलसंपदा विभाग अजूनही या पुलाच्या दुरुस्ती संदर्भात निर्णय घेत नाही. स्थानिकांनी जलसंपदा विभागाकडे वेळोवेळी निवेदने दिली आहेत, मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. लोखंडी कठडे गंजलेले, पूल एकाच मार्गाने जाणारा, पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे दुचाकी, चारचाकीच नव्हे तर पायी चालणार्या नागरिकांनाही धोका निर्माण झाला आहे. कुंडमळा (ता. मावळ) येथे 35 वर्ष जुन्या पुलाच्या अपघातात अनेक निष्पाप जीव गेले. त्याच धर्तीवर रामदरा परिसरातील पूल कधीही कोसळू शकतो. पुण्यातील नाथ हरी पुरंदरे विद्यालयाच्या बस अपघाताची आठवण करून देत नागरिक म्हणतात, दुर्घटना घडल्याशिवाय हे प्रशासन जागे होणार नाही काय? स्थानिक नागरिक, भाविक, पर्यटक आणि सामाजिक संस्थांकडून तत्काळ नवीन पूल बांधण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच, रामदरा परिसराला ’क वर्ग देवस्थान’ म्हणून मान्यता देऊन नियोजनबद्ध विकास करावा, अशीही ठाम मागणी आहे. पूल कोसळल्यानंतर उपाययोजना न करता दुर्घटना होण्याआधीच प्रशासनाने कृती करावी, हेच आजचे खरे आव्हान आहे. 60 वर्ष जुना पूल नवीन मुठा उजवा कालवा हा हवेली, दौंड आणि इंदापूर तालुक्यांतील 66 हजार हेक्टर शेतीला पाणी पुरवतो. या कालव्यावर असलेला पूल आता पूर्णतः कमकुवत झाला असून त्याचे संरचनात्मक बांधकाम ढासळले आहे. अवजड वाहने, पीएमपी बस, ट्रक, डंपर यांचा रोजचा ओघ यामुळे पूल अक्षरशः हलत असल्याचे दृश्य पाहायला मिळते. भाविक, पर्यटक आणि स्थानिकांचा एकमेव मार्ग कोळपे वस्ती, केसकर वस्ती, ढेले वस्ती, फुरसुंगी रेल्वे स्थानक अशा अनेक भागातील नागरिक आणि हजारो पर्यटक रामदरा शिवालयात जाण्यासाठी याच पुलावर अवलंबून आहेत. एका बाजूला धोकादायक पूल, तर दुसरीकडे गर्दी आणि वाहतुकीचा ओघ, ही विसंगती प्रशासनाच्या निष्काळजीपणाची साक्ष देते.