Pune District : राम जन्मला गं, सखी राम जन्मला…

भोर : भोरमधील ऐतिहासिक पंतसचिव राजवाड्यात रामनामाच्या जयघोषात, फुलांची उधळण करीत आणि रामभक्तांच्या अलोट गर्दीत रामजन्म सोहळा अर्थात रामनवमी उत्साहात पार पडला. सकाळी अकराच्या दरम्यान रामाच्या पोशाखाची भोर शहरातून मिरवणूक काढण्यात आली. दुपारी 12 वाजता भोर संस्थानचे राजेशराजे आणि सदस्य यांच्या हस्ते जन्मसोहळा झाला. यावेळी रंगबेरंगी पडद्यांनी आणि फुलांनी राजवाडा सजवण्यात आला होता. ऐतिहासिक राजवाड्यात राजजन्मोत्वाची १५० वर्षांची परंपरा आहे.
भोरच्या पंतसचिवांचे कुलदैवत श्रीराम आहे. संस्थानचे संस्थापक श्रीमंत शंकराजी नारायण यांचे पुत्र नारोपंत यांना पुरंदर तालुक्यातील बेलसर गावातील अंताजी मोरेश्वर खळदकर यांनी 1720 मध्ये श्रीरामाची मूर्ती भोर जवळील ज्या ओढ्याकाठी दिली. त्याला राम ओढा हे नाव मिळाले. त्यापूर्वी पंतसचिवांकडे घरगुती श्रीरामनवमी उत्सव साजरा व्हायचा. ही मूर्ती मिळाल्यापासून श्रीरामनवमी उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक झाले. भोर येथे राजधानी झाल्यावर व विशेषतः हा नवीन राजवाडा बांधल्यावर उत्सवास मोठे स्वरूप आले आहे.
यावेळी संस्थानच्या सदस्यांनी पुणेरी पगडी, मराठमोळी शेरवानी आणि स्त्रियांनी नववारी साड्या असे पोशाख परिधान केले होते. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच रामजन्म सोहळ्यात उत्साहाने सहभागी झाले होते. रामनामाच्या जयघोषात भोरचा राजवाडा परिसर दुमदुमून गेला होता. चैत्र शुद्ध अष्टमीला सकाळी अधिपतिंच्या हस्ते श्रीरामनवमीच्या उत्सवातील धार्मिक व लौकिक कार्यक्रमास सुरूवात होते. राम जन्मोत्सवाला सुमारे 300 वर्षापेक्षा जास्तची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. त्यापैकी सध्या ऐतिहासिक राजवड्यात 150 वर्षे सोहळा साजरा होत आहे.




