Pune District : राजगड तोरणा व लिंगाणा किल्ले सर्वांसाठी खुले

– दैनिक प्रभातच्या वृत्ताची घेतली दखल; पुरातत्त्व विभागाचा निर्णय
वेल्हे – स्वराज्याची प्रथम राजधानी असलेला किल्ले राजगड व स्वराज्याचे तोरण बांधला तो तोरणा (प्रचंडगड) आणि लिंगाणा. या किल्ल्यांवर जाण्यास पुरातत्त्व विभागाने प्रांत अधिकारी भोर यांच्या आदेशाची कोणतीही खातरजमा न करताच एकतर्फी बंदी घालून गडाचे दरवाजे बंद केले होते. तसेच वनविभागाने देखील त्यांचे हद्दीतून गडावर जाण्यास मज्जाव केला होता. मात्र, दि. ५ जूनपासून राजगड, तोरणा व लिंगाणा हे किल्ले प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून सर्वांसाठी खुले करण्यात आले आहेत.
गड किल्ले बंदच्या पुरातत्त्व विभागाच्या अगोदरच्या आदेशामुळे संपूर्ण राजगड तालुक्यात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने स्थानिक लोकांनी पुरातत्त्व विभागाचे विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. दैनिक प्रभातमध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेऊन पुरातत्त्व विभागाने गडांचे दरवाजे उघडले असून गड किल्ले शिवप्रेमींसाठी व पर्यटनासाठी खुले करण्यात आले असून येणाऱ्या पर्यटकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे पुरातत्त्व विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
फेब्रुवारी ते मे महिन्यात उन्हामुळे पर्यटक किल्ल्यावर येत नाही. यामुळे पर्यटनावर अवलंबून असणारा व्यवसाय बंद असतो. जूनपासून पर्यटक किल्ल्यावर जाण्यासाठी येत असतात. या दिवसांत स्थानिकांना रोजगार व व्यवसायिकांचे धंदे चालतात. याच काळातील उत्पन्नावर या दुर्गम भागातील लोकांचे वर्षांचे प्रपंच चालतात. आता हेच गडकोट व पर्यटन स्थळे ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवले असते तर स्थानिकांवर उपासमारीची वेळ आली असती. पुरातत्त्व विभागाच्या किल्ल्आ पर्यटनास खुले करण्याच्या निर्णयाने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे.
– ओंकार बांदल, हॉटेल व्यावसायिक, गुंजवणे (ता.राजगड) – विकास नलावडे, हॉटेल व्यावसायिक वाजेघर (ता. राजगड)





