Pune District : पुरंदर विमानतळ सर्व्हेला आक्रमक शेतकर्यांमुळे ब्रेक

दिवे : पुरंदर तालुक्यातील विमानतळ प्रकल्पबाधित गावांमध्ये शेतकर्यांना विश्वासात न घेता अथवा सर्व्हे कधी करणार याची कोणतीही माहिती न देता शेतकरी बेसावध असताना पुरंदरच्या प्रशासनाने ड्रोन सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला. गावागावांतील दलाल, एजंट यांनी प्रशासनाला लोकांमध्ये एकी नसल्याची माहिती दिली.
त्यामुळेच आपल्याला विरोध फारसा होणार नसल्याचे गृहीत धरून प्रशासनाने घाईघाईने सर्व्हे करण्याचा प्रयत्न केला. परंतु याची माहिती संबंधित गावातील शेतकर्यांना समजताच शेकडोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर जमा झाले. पोलीस फौजफाटा प्रचंड असताना आणि पोलिसांनी जबरदस्तीने सर्व्हे करण्याचा प्रयत्न करूनही आक्रमक शेतकर्यांसमोर नमते घ्यावे लागले.
शेतकर्यांनी विरोध केल्यावर प्रांताधिकारी वर्षा लांडगे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी वेगवेगळ्या माध्यमातून शेतकर्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरून उठणार नसल्याची भूमिका शेतकर्यांनी घेतली. विशेष म्हणजे आंदोलनात महिलांची संख्या आणि आक्रमकता विशेष जाणवत होती. महिला आक्रमक होत असल्याने त्यांना रोखण्यासाठी दुपारी चार वाजता पुन्हा दोन गाड्यांमधून महिला पोलिसांची कुमक मागविण्यात आली; परंतु तरीही महिला आक्रमकच होत असल्याने प्रसासानाला सर्व्हे करता येत नव्हता.
सायंकाळी सहाच्या दरम्यान राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी बोलाविण्यात आली. पोलिसांच्या दबावामुळे सर्व्हे होईल असा प्रशासनाचा कयास होता. मात्र तरीही शेतकरी मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. कोणत्याही परिस्थितीत सर्व्हेकरू न देण्याचा निर्धार शेतकर्यांनी केला. मात्र राज्य राखीव पोलीस दलाच्या बंदोबस्तात शेतकर्यांवर दडपण आणून एखतपूर गावचा सर्व्हे ड्रोनच्या माध्यमातून सायंकाळी साडेसहा वाजता पूर्ण करण्यात आला.





