पुणे जिल्हा : पुरेसे पाणी व पथदिव्यांची सुविधा द्या

– स्वप्नलोक सोसायटीची नगरपरिषदेकडे मागणी
भोर : भोर शहरातील स्वप्नलोक नगरी गृहनिर्माण सहकारी सोसायटीतील नागरिकांना पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नसल्याने असलेल्या दोन इंचीऐवजी चार इंची लाईन जोडण्यात यावी तसेच सोसायटीतील सार्वजनिक रस्त्यावरील पथदिव्यांची दुरुस्ती व सोलर दिवे बसवण्याची मागणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांच्याकडे स्वप्नलोक संस्थेकडून पत्राद्वारे करण्यात आली आहे.
भोर शहरातील सर्वात मोठी स्वप्नलोक गृहनिर्माण सोसायटी असून त्यामध्ये २३ बिल्डींग, ५० बंगलो प्लाॅट, कमर्शिअल बिल्डींग व क्लब हाऊस असून सोसायटीमध्ये ३२४ फ्लॅट आहेत व साधारण १५०० लोक वस्ती आहे. १० वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्याची लाईन दोन इंची दिलेली आहे. परंतू ते पाणी आता १५०० लोकवस्तीला पुरेसे पडत नाही. तीन दिवसांनी आम्हाला पिण्याचे पाणी लोकाना द्यावे लागत आहे.
तरी प्रशासनाने सोसायटीचा सर्वे करून पुर्वीच्या दोन इंचीऐवजी चार इंची पिण्याच्या पाण्याची लाईनची व्यवस्था करावी. तसेच सोसायटीतील स्ट्रीट लाईटमधील बऱ्याच लाईट बंद आहेत त्या दुरुस्त करण्यात याव्यात. नवीन सोलर दिवे बसवण्याची मागणी स्वप्नलोक नगरी सहकारी गृहरचना संस्थेतर्फे चेअरमन नितीन दामगुडे, सचिव सुरेश वाडकर, खजिनदार किशोर शेडगे सह संचालक मंडळाने निवेदनाद्वारे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांचेकडे केली आहे.
तर उत्पन्नात वाढ
सद्यस्थितीत असलेल्या दोन इंची पाण्याच्या लाईनचा टॅक्स वार्षिक २२ हजार रुपये येत आहे व तो दरवर्षी भरला जातोय. नगरपरिषदेमार्फत चार इंची लाईनने रोजचे पिण्याचे पाणी पुरेसे दिले तर सोसायटीकडून नगरपरिषदेचे अंदाजे दर वर्षीचे उत्पन्न तीन लक्ष मिळणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.





