दौंड : शहरात गटारीच्या घाण पाण्यात बसून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे.यामुळे शहरातील घाणीचा विषय ऐरणीवर आला आहे. दौंड शहरात ठीक ठिकाणी कचरा साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दौंडकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तक्रारी आल्यानंतर नगरपालिकेकडून वेळप्रसंगी साफसफाई केली जात आहे. मात्र त्यांचे प्रयत्न फारच तोकडे पडत असल्याचे दिसते आहे. शहरातील भाजी मंडई, हिंदू स्मशानभूमी, चैतन्य मारुती मंदिर, मुस्लिम दफनभूमीला जाणार्या रस्त्यावरील गटारीचे चेंबर तुंबल्याने त्यातील घाण पाणी रस्त्यावरून ओसंडून वाहत आहे. याच घाण पाण्यातून अंत्ययात्रा घेऊन जावी लागत आहे. ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. याचा तीव्र निषेध करीत मनसेचे जिल्हा पदाधिकारी सचिन कुलथे यांनी या घाण पाण्यातच बसून आपले आंदोलन सुरू केले आहे. मध्यंतरी या चेंबरचे तात्पुरते काम करण्यात आले होते परंतु चेंबर पुन्हा तुंबले आहे व नेहमीप्रमाणे या रस्त्यावरून घाण पाणी वाहत आहे. याच रस्त्यालगत कमालवाडी वसाहत आहे, या ठिकाणी अनेक कुटुंबे राहतात. येथील रहिवाशांना याच गटारीच्या घाण पाण्यातून मार्ग काढीत घरात जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. नगरपालिकेने यावर कायमस्वरूपी तोडगा काढून परिसर स्वच्छ करावा व परिसरातील मंदिर, हिंदू स्मशानभूमी, मुस्लिम दफनभूमी यांचे पावित्र्य जपावे, अशी मागणी होत आहे. दौंड : गटारीच्या घाण पाण्यात बसून मनसेने आंदोलन केले.