पुणे जिल्हा : कांदा व पेरू पिकाचे योग्य नियोजन करा

पळसदेव – सध्या कांद्याला चांगले भाव आहेत; मात्र कांदा पिकही एक प्रकारची जुगार समजूनच शेतकरी करतात कांद्याला योग्य भाव मिळाला तर ठीक अन्यथा झालेला उत्पादन खर्च देखील कांदा पिकातून निघत नाही. त्यामुळे शेतकर्यांनी कांदा आणि पेरू पिकाचे योग्य नियोजन केल्यास शेतकर्यांची आर्थिक उन्नती साधण्यास मदत होईल, असे मत प्रतीक मोरे यांनी पळसदेव येथे बोलताना व्यक्त केले.
पळसदेव येथे कांदा व पेरू पिकासाठी शेतकरी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी इनसेक्टीसाइड इंडिया लिमिटेडचे डेव्हलपमेंट मॅनेजर प्रतीक मोरे बोलत होते. यावेळी मोरे यांनी शेतकर्यांना कांदा व पेरू पिकाबाबत मार्गदर्शन केले. सध्या कांद्याला चांगला भाव आहे तर पेरूला मातीमोल किंमत आहे.
त्यामुळे पेरू उत्पादक शेतकरी अक्षरशा रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे; तर कांद्याने पन्नाशी पार केले असताना शेतकर्याकडे कांदाच शिल्लक नाही. त्यामुळे या वाढलेल्या भावाचा फारसा फायदा शेतकर्यांना होत नाही. त्यामुळे दोन्ही पिकाची नेमके नियोजन कसे करावे, याबाबत या परिसरामध्ये मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पेरू व कांदा पिकाची लागवड, औषध फवारणी, तन व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. भविष्यकाळात शेतकर्यांनी या दोन्ही पिकाचे योग्य नियोजन करून फायद्याची शेती करावी असा सल्ला यावेळी मोरे यांनी उपस्थित शेतकर्यांना दिला. यावेळी प्रसाद कृषी सेवा केंद्राचे राहुल बनसुडे, नरेंद्र देशमुख,
अनिल तोंडे, अमर डोंगरे, कांदा उत्पादक शेतकरी अमोल गांधले, मारुती बनसुडे, संतोष बनसुडे, पांडुरंग बनसुडे, हनुमंत बनसुडे, महेश बनसुडे, विशाल बनसुडे सनील शिंदे सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित शेतकर्यांनी पेर व कांदा पीक परिसरात आयोजित केल्याबद्दल आयोजकाचे आभार मानले.





