राजुरी : जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात उन्हाळी बाजरीचे पीक सध्या जोमात असून ठिकठिकाणी बाजरीचे पीक फुलोर्यात दिसत आहे. बाजरी पिकाची पेरणी, खुरपणी त्यासोबत अंतर्गत मशागत करून पावसाळी बाजरी उत्पादनापेक्षा उन्हाळी बाजरीचे उत्पादन जास्त प्रमाणात होत असून एकरी 15 ते 20 क्विंटल बाजरीचे उत्पादन येथील शेतकरी घेत आहेत. जुन्नरच्या पूर्व भागाच्या परिसरात सुरुवातीला काळात 2008च्या अगोदर येथील शेतकरी अन्नधान्य उत्पादन पावसाळ्यात घेत होते. खरिपाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणात केल्या जात होत्या त्यामध्ये बाजरी, मठ, हुलगे, खुरासने, तूर, भुईमूग, तीळ, मूग यांसारख्या पिकाचे शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत होते. या पिकाचे उत्पादन पावसा वरती अवलंबून होते.पर्जन्यमान चांगले झाले तर येथील शेतकर्यांना पिकाचे चांगले उत्पादन होत. परिसरातील शेतकरी पावसाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेत होते. मात्र, 2009 पासून यापरिसरात शेती पिकाच्या उत्पादनात बदल केला. येथील परिसरातील बेल्हे, राजुरी, आळे या मोठ्या गावांसह वाड्यावस्त्यांना वरदान ठरलेला पिंपळगाव जोगे कालव्याच्या पाण्यामुळे येथील शेतजमीन ओलिताखाली आल्या. यापूर्वी पाण्यापासून वंचित असलेल्या बेल्हे, राजुरी, आळे, लवणवाडी, उचखडक, गुंजाळवाडी, पिंपळ झाप, बांगरवाडी, रानमळा आदी गावांच्या परिसरात पिंपळगाव जोगे कालव्याचे पाणी मिळाल्याने येथील शेतकर्यांनी बारमाही बागायती पिकांकडे वळाले. त्यानुसार ऊस, कांदा, टोमॅटो, काकडी, मिरची, केळी, डाळिंब, द्राक्षे, गहू, हरभरा यांसारख्या तरकारी, फळबागा पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत.तसेच शेतीपूरक व्यवसाय म्हणून या ठिकाणी दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो, त्यामुळे येथील शेतकरी जनावरांना लागणारा चार्याचे उत्पादन शेतामध्ये घेत आहेत. तर सध्या या परिसरात उन्हाळी बाजरीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. बाजरीची सरमाड सध्या जनावरांच्या चार्यासाठी दूध उत्पादक शेतकर्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सध्या शेत शिवारात फुलोर्यात असणारी बाजरीचे पीक सध्या रुबाबात बोलताना दिसत आहे. तसेच फुलोर्यात असणारी बाजरी पीक सध्या लक्ष वेधून घेत आहे.