परिंचेत बेंदूर उत्साहात साजरा : जेसीबीमधून गुलालाची उधळण परिंचे – परिंचे (ता.पुरंदर) परिसरात शेतकर्यांनी आषाढी बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा केला असला तरी पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त असल्याचे चित्र दिसून आले आहे. परिसरात पेरणी कामे उरकली असली तरी समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. पारंपरिक वाद्यांच्या बरोबर तरुणांनी डिजेच्या तालावर नाचत मिरवणूक साजरी केली यावेळी जेसीबीमधून गुलालाची उधळण करण्यात आली. बेंदूर सणाच्या निमित्ताने बैलांना सजवण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकर्यांनी बाजारपेठेत सकाळपासून गर्दी केली होती. उन्हाळ्यात जमिनीची मशागत, पेरणीपूर्व मशागत व पेरणी या कामांमधून शेतकर्यांबरोबर शेतात काबाडकष्ट करणार्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा उद्देशाने या सणाला शेतकर्यांमध्ये विशेष महत्त्व प्राप्त आहे. घरातील प्रत्येक सदस्य या सणात सहभाग घेत असून सकाळपासून उत्साहाचे वातावरण होते. शेतातील जनावरांना सकाळी आंघोळ घालून रंगविण्यात आले. बैलांच्या शिंगांना आकर्षक रंग, बेगाडे, रंगीबेरंगी फुगे, गळ्यात हार, पायात चाळ, कपाळावर बाशिंग, अंगावर रेशमी कापडाची झुल टाकून सजवून गावातून सवाद्य मिरवणूक काढली आली होती. बैलगाडा शर्यती सुरू झाल्याने या परिसरात बैलांच्या संखेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तरुणांमध्ये बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली आहे. बैलांच्या अंगावर वेगवेगळ्या म्हणी लिहून बळीराजाच्या सुखा समाधानासाठी प्रार्थना करण्यात आली. ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन प्रदक्षिणा मारून बैलांना वाजत गाजत घरी नेण्यात आले. घरी गेल्यावर सुवासिनींनी बैलांची पूजा करून गुळ पोळीचा नैवेद्य बैलांना भरविला.