पुणे जिल्हा : वृद्धेला चाकूचा धाक दाखवून लुटणारे जेरबंद

चौघांचा पोलीस कोठडी : अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नारायणगाव : शेतात काम करणार्या वयोवृद्ध महिलेला चाकूचा धाक दाखवून चोरी करणा-या चौघांना पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून 2 लाख 51 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली.
सुरज ऊर्फ मोन्या संजय देडगे (वय 24), प्रथमेश ऊर्फ समर्थ संतोष सासवडे (वय 19, दोघे रा. शिक्रापूर, ता. शिरूर), अनिकेत रमेश सरोदे (वय 20, रा. शिरूर), अमोल एकनाथ पेटारे (वय 29, रा. बजरंगवाडी ता. शिरूर) असे जेरबंद करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर भामा बाबाजी येवले (वय 61, रा. पारगाव तर्फे आळे ता. जुन्नर) यांनी फिर्याद दिली होती.
कावळ पिंपरी (ता.जुन्नर) गावच्या हद्दीतील येवले शेतीमध्ये दिवसा शेती काम करीत जनावरे चारत असताना मोटरसायकलवरून आलेल्या तीन अनोळखींनी चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन गळ्यातील व कानातील दागिने असा 1 लाख 89 हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती.
भर दिवसा रस्त्यालगत जनावरे चारत असणार्या वयोवृद्ध महिलेला लुटण्याचा प्रकार घडल्याने गुन्ह्याचे गांभीर्य वाढले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत मोटरसायकल ज्या दिशेने गेली त्या दिशेने तपास सुरू केला. तपासात उपयुक्त माहिती उपलब्ध झाल्याने संशयित मोटरसायकल शिक्रापूर येथे पोहोचल्याचे निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.
स्थानिक गुन्हा शाखेचे अविनाश शिळीमकर, तुषार पंदारे, दीपक साबळे, जनार्दन शेळके, संजू जाधव, संदीप वारे, अक्षय नवले, अतुल डेरे, राजू मोमीन, सागर धुमाळ, निलेश सुपेकर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, उपनिरीक्षक जगदीश पाटील यांनी कारवाई केली. पुढील तपास नारायणगाव पोलीस करीत आहे.





