Pune District : मोटेवाडीतून १ लाख ४० हजारांचे डाळिंब चोरीला

शिरूर तालुक्यातील तिसरी घटना
निमोणे – शिरुर तालुक्याच्या पूर्व भागातील मोटेवाडी गावातील शेतकरी संदीप दौलत येलभर यांच्या डाळिंबाच्या शेतातून सरासरी १ लाख ४० हजार रुपये किंमतीचे सुमारे १४०० किलो डाळिंब चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी येलभर यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
संदीप येलभर यांची मोटेवाडी येथे २ एकर डाळिंब बाग आहे. सोमवार (दि.८) रोजी पहाटे येलभर हे शेतीत पाहणीसाठी गेल्यावर मोटरसायकलजवळ दोन भरलेल्या व पाच मोकळ्या डाळिंबाच्या गोण्या आढळल्या. यावेळी त्यांनी गावातील इतर नातेवाईकांना व मुलांना घटनास्थळी बोलावून घेतले. झाडांवर फळे कमी असल्याचे निदर्शनास आल्याने चोरीचा ठोस संशय निर्माण झाला. चोरट्यांनीच ही रात्रीच्या वेळी चोरी केल्याचा संशय येलभर यांनी व्यक्त केला आहे. शिरुर पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
घटनेने शिरुर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले असून तालुक्यात महिनाभरात डाळिंब चोरीची ही तिसरी घटना आहे. आधी उरळगाव येथे ७ लाखांचे, शिंदोडी येथे ४ लाख ५० हजारांचे आणि आता मोटेवाडी येथे १. ४० हजारांचे डाळिंब चोरीला गेले आहे. दहिवडी गावात शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे डाळिंब चोरीचा प्रयत्न फसला होता. त्यामुळे शिरुर तालुक्यात पुन्हा एकदा शेतीमाल चोरीच्या घटनांबाबत चिंता निर्माण केली आहे. पोलिसांनी चोरांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.





