Pune District : डाळिंब बागा व तरकारी पिके धोक्यात, टाकळीहाजी बेट परिसरात पावसाचा परिणाम

शिरूर : मे महिन्यात झालेल्या अवकाळी जोरदार पावसामुळे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले असून डाळिंब बागासह इतर तरकारी पिके भुईसपाट झाली आहेत. काही ठिकाणी वाहून गेली आहे. पाऊस उघडल्यामुळे आता तलाठी, मंडल अधिकारी यांच्यामार्फत नुकसान भरपाईचे पंचनामे सुरू झाले आहे. पावसामुळे तालुक्यातील ओढे तळी, नदी,नाले भरून वाहत आहे. त्यामुळे शिरूर शहरासह तालुक्यातील पाणी प्रश्न आता मिटलेला दिसून येत आहे.
डाळिंबाचे आगार मानल्या जाणाऱ्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरात शेतकऱ्यांनी यंदा डाळिंब बागांना हस्तबहार धरत खत, औषधे, पाणी यांचे काटेकोर नियोजन केले. हमखास उत्पन्नाच्या आशेवर उभारलेल्या बागा अवकाळी पावसाने मातीत मिसळल्या. लाखो रुपयांची गुंतवणूक झाल्यावरही हातात काहीच न लागण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात खोलवर घर करून बसली आहे.
पावसामुळे अनेक बागा मुळासकट उखडल्या असून, तयार फळे झाडावर राहतील की नाही यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वाढलेली आर्द्रता व वारंवार पाऊस यामुळे मर, बुरशीजन्य रोग, सुरस्या, तेल्या यांसारख्या रोगांचा प्रकोप झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फवारण्या कराव्या लागत असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च वाढत आहे.
फवारणी करताना केमिकल्स अंगावर उडत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्वचेचे विकार, श्वसनाचे त्रास, डोळ्यांचे आजार भेडसावत आहेत. पाऊस थांबेल या आशेवर औषधं हातात घेऊन उघडीपणाची वाट पाहतो. मग चिखलातून ट्रॅक्टर चालवत फवारणी करतो. पण चिखलात ट्रॅक्टर अडकत आहे. पुन्हा दुसऱ्या ट्रॅक्टरने त्याला बाहेर काढावे लागत आहेत. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हताशपणा स्पष्ट दिसत आहे.
शेतकऱ्यांची मेहनत, आशा, आणि त्यांचे भवितव्य पावसाच्या तडाख्यात हरवत चालले आहे. शेतकऱ्यांनी फळे आणि झाडे वाचविण्यासाठी संघर्ष केला नाही. डाळिंबाचे आगार असलेला टाकळी हाजी परिसर वेदनेचा केंद्र बनण्याची वेळ येईल.
– नारायण कांदळकर, डाळिंब उत्पादक, टाकळी हाजी.





