Pune District : अकलूज बाजार समितीत डाळिंब 301 रुपये किलो

अकलूज – सहकार पंढरी अशी ओळख असलेल्या अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळींबाला 301/- रुपये प्रति किलो उच्चांकी दर मिळाल्याने डाळींब बागायतदार शेतकरी बांधवामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. सहकार पंढरी डाळींब पंढरी म्हणून पुढे येत आहे.
अकलूज बाजार समितीमध्ये सिध्दीविनायक फ्रुट कंपनीचा सागर नागणे यांचा आडत दुकानी दत्तात्रय पाटील (रा. फोंडशिरस) या शेतकर्याच्या भगवा जातीचा डाळींबाला 301/- रुपये प्रति किलो दर मिळाला. तसेच बालाजी फ्रुट कंपनी चालक अमोल जाधव यांच्या आडत दुकानी शेतकरी युवराज मारकड (रा. मारकडवाडी) यांच्या भगवा जातीचा डाळींबाला 301/- रुपये प्रति किलो दर मिळाला व
जयअंबे फ्रुट कंपनी चालक मनोज जाधव यांच्या आडत दुकानी तुकाराम पावले तसेच मोहम्मद साद फ्रुट कंपनी चालक राजूभाई बागवान यांच्या आडत दुकानी अंकुश केचे यांचा भगवा जातीचा डाळींबाला 301/- रुपये प्रति किलो दर मिळाला. तसेच शेतकरी गणेश लवटे (रा. फोंडशिरस) यांच्या डाळींबाला गेले आठ दिवस दररोज 250/- रुपये प्रति किलो दराने डाळींबीची विक्री होत आहे. सौदे बाजाराच्या वेळी सर्व आडते, खरेदीदार व शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.
डाळींब पूर्व हंगाम सुरू होत असताना चांगल्या दरामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अकलूज बाजारपेठ मध्यवर्ती असल्याने इंदापूर, माढा, माण, खटाव, फलटण येथून शेतकरी डाळींब विक्रीसाठी अकलूज बाजार समितीकडे आणत आहेत. बाजार समितीमध्ये शेतमालाची योग्य प्रतवारी मापाडी तोलार यांच्याकडून चोख वजन शेतमालाची रोख पट्टी या गोष्टीमुळे अकलूज बाजार समितीचे नाव झाले आहे.
बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार पेठेमध्ये सुक्ष्म नियोजन व पायाभूत सुविधा यामुळे बाजार घटक समाधानी असल्याचे समितीचे सभापती मोहिते-पाटील यांनी सांगितले.





