Pune district : दिवसा खेळीमेळीत तर रात्री गोंधळात सांगता

सोमेश्वरच्या सभेत सर्व विषयांना मंजुरी : ६१ वी सभा खेळीमेळीत
सोमेश्वरनगर – सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत सिरपपासून इथेनॉलनिर्मिती करण्यासाठी यंत्रसामग्रीमध्ये बदल करण्यास , सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीस तसेच गोदाम दुरुस्तीस मंजूरी देण्यात आली. त्यामुळे दीड लाख क्विंटल साखर पोती क्षमतेचे गोदाम होणार आहे. दरम्यान अंतिम ऊसदरात वाढ करून सभासदांची दिवाळी गोड होण्यासाठी सभासदांनी मागणी करीत अधिक काळ चर्चा केली. मात्र, मागणीला यश आले नाही. दरम्यान, सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. यावेळी विविध विषयांवर सभासद आणि संचालक मंडळामध्ये चर्चा झाली. दिवसभर खेळीमेळीत सुरू असलेली सभा रात्री मात्र गोंधळात संपली. सभेत अनेक सभासदांनी विषयांवर चर्चा केली.
बारामती तालुक्यातील सोमेश्वर कारखान्याची ६१ वी बार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. २९) कारखाना कार्यस्थळावर पार पडली. या वेळी अध्यक्षस्थानी सोमेश्वरचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप होते.
यावेळी शहाजीराव काकडे, सतीशराव काकडे, प्रमोद काकडे, विजयकुमार सोरटे, सतीश खोमणे, दिलीप फरांदे, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, भाजप नेते दिलीप खैरे , माणिकराव झेंडे यांच्यासह सभासद व संचालक मंडळ उपस्थित होते. सभेत प्रमोद काकडे यांनी, संचालकांनी नात्यातल्या लोकांची कामगार भरती केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
विक्रम भोसले, शिवाजी शेंडकर, धीरज गायकवाड यांनी मंगल कार्यालय उभारणी, ऐच्छिक आरोग्यविमा राबविण्याची मागणी केली. रमाकांत गायकवाड, रूपचंद शेंडकर, बुवासाहेब हुंबरे, यांनी करंजे भागशाळेची सुधारणा करण्याची मागणी केली. राजेंद्र जगताप यांनी साखर मूल्यांकन माळेगावप्रमाणे ३७५० धरा आणि ऊसदर वाढवा, अशी मागणी केली. यावर कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी मुद्देसुद उत्तर देत स्पष्ट खुलासा केला. धैर्यशील काकडे यांनी पेट्रोल पंप उधारी देणे बंद करावे, असे मत मांडले. संचालकांच्या भत्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर पुरुषोत्तम जगताप यांनी साखर संचालक मंडळाच्या बैठकीत यावर विचार करू असे सांगितले.
भाजप नेते दिलीप खैरे, राजेंद्र जगताप, पी. के. जगताप, योगेश भोसले , केतन भोसले, राजेंद्र लकडे, शंकर दडस, दत्तात्रय भोईटे आदींसह अनेक सभासदांनी प्रतिटन ३ हजार ४०० रुपये ऊसदर अमान्य करीत आणखी २०० रुपये वाढविण्याची मागणी केली. प्रमोद काकडे यांनीही गतहंगामापेक्षा यंदा १७१ रुपये दर कमी दिल्याची खंत मांडली. यावर पुरुषोत्तम जगताप म्हणाले, इतर कारखाने कसाही दर बसवतात. आपण रास्त हिशोब नियमानुसार साखर मूल्यांकन ३ हजार ६२३ रुपये केले आहे.
विराज मदने यांनी एआयतंत्रज्ञानाचा वापर करण्यास सभासदांना प्रोत्साहन देण्यासाठी माळेगाव प्रमाणे सोमेश्वर कारखान्याने सभासदांना अनुदान देण्याची मागणी केली. कांचन निगडे यांनी सोमेश्वर शिक्षण संस्थेची पुरंदरमध्ये भाग शाळा सुरू करण्याची मागणी केली. गणेश फरांदे यांनी कारखान्याच्या मालकीची अग्निशमन गाडी खरेदी करावी, असा प्रस्ताव मांडला त्याला विक्रम भोसले यांनी अनुमोदन दिले.
यावेळी दत्ताजी चव्हाण, कांचन निगडे, बाळासाहेब गायकवाड, दत्तात्रय ढोले, प्रवीण सूर्यवंशी, शिवराज चव्हाण, भगवान गोफणे आदींनी विविध विषयांवरील चर्चेत सहभाग घेतला. कालिदास निकम यांनी अहवाल वाचन केले, मिलिंद कांबळे यांनी आभार मानले.
सिरपपासून इथेनॉलनिर्मितीसाठी १३ कोटींचा खर्च
सिरपपासून इथेनॉलनिर्मितीसाठी उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पास १३ कोटी ९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी कारखाना जिल्हा बँककडून ७० आणि स्वभांडवलातून ३० टक्के रक्कम, तर सोलर पॉवर प्रोजेक्टसाठी ३ कोटी ५० लाख रुपये खर्च येणार असल्याचे पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले. तसेच सर्वच कारखान्यांना सोलर पॉवर प्रोजेक्ट करणे शासनाने बंधनकारक केल्याने तो प्रोजेक्ट करावा लागत असल्याचे पुरुषोत्तम जगताप यांनी स्पष्ट केले.





