Pune District : पेट्रोल पंपावरील चोरीच्या आरोपीला गुजरातमधून अटक

शिरूर – निमोणे (ता. शिरूर) येथील पेट्रोल पंपावर कामगार म्हणून ठेवण्यात आलेल्या व्यक्तींनी ९४ हजार पाचशे २० रुपयांची रोकड चोरल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपीला गुजरातमधून अटक केली असून, या गुन्ह्यातील दुसरा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला येरवडा येथील बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात आले आहे. या चोरीच्या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार प्रताप टेंगले करीत होते.
तपासादरम्यान पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळाली की, आरोपी रामेश्वर हरीश्चंद्र गोंड (रा. देवरी, जि. रामसेन, मध्यप्रदेश) हा सध्या गुजरात राज्यातील मोरबी (ता. साखोडा) येथे काम करत आहे.
या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक केंजळे यांनी तात्काळ पोलीस हवालदार प्रताप टेंगले, नाथसाहेब जगताप आणि अंमलदार अजय पाटील यांचे विशेष पथक तयार करून आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले. पथकाने साखोडा येथे जाऊन तांत्रिक विश्लेषण आणि गुजरात पोलिसांच्या मदतीने आरोपी रामेश्वर गोंड याला अटक केली.
त्याला (दि. १८) शिरूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातील विधीसंघर्षित बालकास येरवडा येथील बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे. अधीक्षक संदीपसिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आणि संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत पोलीस हवालदार प्रताप टेंगले, नाथसाहेब जगताप, अंमलदार विजय शिंदे व अजय पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली.





