Pune District : पढरवाडी-वांद्रे गाव पर्यटकांनी गजबजले

गावातील नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध
राजगुरुनगर – खेड तालुक्यातील पढरवाडी वांद्रे गावातील नवे पर्यटनस्थळ ठरतेय राज्यातील पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. येथे राज्यभरातील मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने पढरवाडी-वांद्रे गाव पर्यटकांनी गजबजले आहे. तर या गावासह परिसरातील गावातील नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे.
खेड तालुक्यातील पढरवाडी-वांद्रे येथे एक नवे पर्यटन स्थळ उदयास आले आहे. सह्याद्रीच्या कुशीतील हिरवागार परिसर, धुके, आणि धो-धो कोसळणारा पाऊस यामुळे हे ठिकाण पर्यटकांचे नवे आकर्षण बनले आहे. मावळ तालुक्यातील लोणावळ्याच्या भुशी डॅमप्रमाणेच येथील निसर्गरम्य वातावरण आणि धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि भाजप नेते शरद बुट्टे पाटील यांच्या संकल्पनेतून पढरवाडी वांद्रे गाव विकसित झाले असून हे पर्यटन स्थळ सुरक्षित आणि कुटुंबासह फिरण्यासाठी योग्य आहे. पढरवाडी – वांद्रे येथे जाण्यासाठी सुखर व सुरक्षित मार्ग आहे.
पुण्यापासून 50 किमी अंतरावर हे पर्यटनस्थळ सर्वांचे आकर्षण बनले आहे. पावसाळ्यात निसर्गरम्य वातावरणामुळे मुलांसह येणार्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. विशेषतः शनिवार-रविवारच्या सुट्टीच्या दिवशी येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. या पर्यटन स्थळामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी सुरू केलेले अल्पोपहार गृहे आणि चहाच्या टपर्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे, ज्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. पढरवाडी वांद्रे येथील हे नवे पर्यटन स्थळ पुणे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देत आहे. लोणावळ्याच्या गर्दीपासून दूर, शांत आणि सुरक्षित पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण नक्कीच पर्यटकांचे आवडते स्थळ बनले आहे.





