पुणे जिल्हा : आमचं पवारांशी नातं कौटुंबिक – आमदार अतुल बेनके

बारामती/ जळोची – दरवर्षी दिवाळी पाडव्याला बारामतीत यायचं हा गेल्या अनेक वर्षातील शिरस्ता आहे. आमचे नाते राजकीय नसून ते कौटुंबिक आहे. राष्ट्रवादी एकसंघ राहावा ही आमची अपेक्षा असल्याचे मत आमदार अतुल बेनके यांनी व्यक्त केले.
आमदार बेनके यांनी येथील गोविंदबागेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दिवाळी पाडव्याला भेट घेतली. ते म्हणाले, माझे वडील वल्लभशेठ बेनके हे दरवर्षी दिवाळी पाडव्याला पवार, खासदार सुळे यांना भेटायला यायचे.
मी अनेक वर्षे येत आहे. यातून राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. राजकारणापेक्षा आमचे नाते कौटुंबिक आहे. पक्ष एकसंघ राहावा ही माझ्यासह अनेकांची भावना आहे. भविष्यात तो एकसंघ राहिल.
मी माझी राजकीय भूमिका पहिल्याच दिवशी स्पष्ट केली असून त्यावर मी ठाम आहे. मी जुन्नरकरांच्या कामासाठी कटिबद्ध आहे. माझे कार्यकर्ते व जनता यांच्याशी बोलून मी राजकीय निर्णय घेईल.





