Pune District : मंचर बाजार समितीत कांद्याचे भाव गडगडले

मंचर : आवक वाढल्याने तसेच कमी प्रतीचा कांदा विक्रीसाठी आल्याने मंचर कृषि उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव कमी झाले आहेत. रविवार, दि.२३ रोजी दहा किलो कांदा २७० रुपये या भावाने विकला गेला आहे, अशी माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला रविवारी १० किलोला २७० रुपये असा बाजारभाव मिळाला. ३८ हजार ५७६ पिशवी कांद्याची आवक होवून चांगल्या प्रतीचा कांदा दहा किलोला २७० रुपये या भावाने विकला गेला आहे.
मंचर बाजार समितीत कांद्याची आवक वाढू लागली असून चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी शेतात काढलेला कांदा लगेच विक्रीसाठी आणत आहे. अनेक वेळा काढणी लवकर केल्याने कांद्याची प्रतवारी नीट राहत नाही. त्यामुळेही बाजारभाव कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
कांद्याचे प्रति दहा किलोचे दर पुढीलप्रमाणे : सुपर लॉट १ नंबर गोळा कांदा २५० ते २७० रुपये,सुपर गोळे कांदे १ नंबर २२० ते २५० रुपये, सुपर मिडीयम २ नंबर कांद्यास १८० ते २२० रुपये, गोल्टी कांद्यास ८० ते १५० रुपये, बदला कांद्यास ४० ते १०० रुपये असा बाजारभाव मिळाला.





