बारामती : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय
कबड्डी, खो- खो, कुस्ती, व्हॉलीबॉल या चार स्पर्धांच्या आयोजनासाठी आता एक कोटींचा निधी दिला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
राज्य शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र क्रीडा असोसिएशन यांनी बारामती येथे संयुक्तपणे आयोजित केलेल्या 23 व्या ‘छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे’ उद्घाटन बुधवार (दि.१५) रोजी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
समारंभप्रसंगी स्पर्धेत सहभागी खेळाडू, मार्गदर्शक, प्रशिक्षक, कबड्डी रसिकांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आयोजित होणाऱ्या कबड्डी, खो- खो, कुस्ती आणि व्हॉलीबॉल या चार राज्यस्तरीय स्पर्धांसाठी दिले जाणारे 75 लाख रुपयांचे अनुदान वाढवून ते एक कोटी करण्याची घोषणा केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या घोषणेमुळे देशी खेळांच्या प्रचार-प्रसार आणि खेळाडूंच्या विकासाला अधिक बळ मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या घोषणेचे क्रीडा जगतातून स्वागत होत आहे. यावेळी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री पंकजा मुंडे, माणिकराव कोकाटे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.