लोणी धामणी : जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथील ढोबळेवाडीतील निवृत्ती हरिभाऊ टाव्हरे यांच्या दीड एकर शेतातील उस शॉर्ट सर्किटमुळे जळाला आहे. शनिवार (दि.१) रोजी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. ऊसाच्या शेतातून विद्युत तारा जात असल्याने शेजारीच असलेल्या विद्युत खांबावर जंप तुटून स्पार्किंग झाल्यामुळे ठिणग्या खाली पडून ऊस जळाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आग आटोक्यात आणण्यासाठी काळूराम टाव्हरे व सहकाऱ्यांनी प्रयत्न केले. टाव्हरे यांनी ऊस जळाल्याने आर्थिक नुकसान झाले असून महावितरणने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. शॉर्ट सर्किटची घटना समजताच महावितरणचे कर्मचारी घटना स्थळी पोहचले व त्यानी विद्युत पुरवठा बंद केला.