Pune District : तुझ्यासाठी आता जिल्हा पातळीवरच पद आणणार

निमोणे : सन 2021 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्याच्या आईचा अवघ्या दोन मतांनी पराभव झाला. हा पराभव त्याच्यासहीत सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेला. पण भावानं आईला शब्द दिला. ’आता गाव पातळीवर नाही लढायचं… तुझ्यासाठी जिल्हा पातळीवरच पद आणणार’… अन पठ्यानं दिलेला शब्दच खरा केला. सन 2023 च्या राज्यसेवा परीक्षेत त्याची जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी निवड झाली. आता तो जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत आणि पंचायत समित्या यांचा अधिकारी झाला.
एखाद्या चित्रपटाचं कथानक शोभावं असा हा प्रसंग घडलाय शिरूर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात. येथील शेतकरी कुटुंबातील स्वप्निल नामदेव वाळुंज याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदिपक यश मिळवले. जानेवारी 2024 मध्ये झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 या परीक्षेचा निकाल 26 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर झाला होता. स्वप्निल वाळुंज याने या परीक्षेत राज्यात 68 वा क्रमांक मिळवत कुटुंबीय व गावचे नाव उज्वल केले आहे.
’पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा’ या संतवचनाप्रमाणे स्वप्निल वाळुंजच्या रुपाने शिंदोडी गावचे नाव प्रथमच महाराष्ट्र राज्यात झळकले. शेतकरी कुटुंबातील स्वप्निल याची आई गृहिणी तर वडील शेतकरी आहेत. एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेल्या स्वप्निलने सन 2019 पासुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती; परंतु कोरोना महामारीमुळे सन 2020 आणि सन 2021 या दोन वर्षांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा झाल्या नाहीत.
त्यामुळे 2022 मध्ये झालेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेत स्वप्निलने सहायक आयुक्त, (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) तसेच मंत्रालय कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक या तीन परीक्षेत घवघवीत यश मिळवले. त्यानंतर सन 2023 च्या राज्यसेवा परीक्षेत त्याची नुकतीच उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी निवड झाली.





