प्रलंबित असलेल्या ग्राम न्यायालयाचे उद्घाटन : सर्वसामान्यांना दिलासा वेल्हे – सर्वांनी मिळून ग्राम न्यायालयाच्या कायद्याचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळवून द्यावा आणि यात महत्त्वाची जवाबदारी वकिलांनी पार पाडावी, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पालक न्यायाधीश रेवती मोहिते-डेरे यांनी वेल्हे येथे केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेल्हे ग्राम न्यायालयाच्या उदघाटन कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत हे ग्राम न्यायालय उभारण्यात आले आहे. यावेळी उच्च न्यायालय मुंबईचे न्यायाधीश संदीप मारणे, पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शाम चांडक, खासदार सुप्रिया सुळे, वेल्ह्याचे न्यायाधीश चिंतामण शेळके, तहसीलदार दिनेश पारगे, सहायक पोलीस निरीक्षक रणजित पठारे, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य राजेंद्र उमाप, जिल्हा बॅंकेच्या संचालिका निर्मला जगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष रेणुसे, माजी अध्यक्ष शंकर भुरूक, तान्हाजी मांगडे, वेल्हे बार एसोसिएशनचे अध्यक्ष विजय झांजे, सुनीता कडू, सुनील राजिवडे, शंकर ढेबे उपस्थित होते. वेल्हे तालुक्यातील नागरिकांना न्यायालयात दाद मागण्यासाठी 80 ते 90 किमीचा प्रवास करून पुणे या ठिकाणी यावे लागत होते. वाहनांची गैरसोय, दुर्गम भाग, वेळ, प्रवास खर्च व उशीर झाल्यास निवासाची व्यवस्था अशा अनेक संकटांना सामना करावा लागत असल्याने अनेक लोक या प्रक्रियेपासून दूरच होते तर कित्येक जण अन्याय होऊनसुद्धा न्याय मागायला धजावत नव्हते. आता मात्र तालुक्यात ग्राम न्यायालय सुरू झाल्याने वेल्हेकरांना एक प्रकारे दिलासा मिळणार आहे. ग्राम न्यायालयाचे कामकाज सोमवार व शनिवार असे आठवड्यातील दोन दिवस चालणार असून, बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दुर्गम वेल्ह्यात ग्राम न्यायालय सुरू झाल्याने येथील नागरिकांना येथेच न्याय मिळणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.