पुणे जिल्हा : आप्पासाहेब पवार यांना दौंडची उमेदवारी द्या

आढावा बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी
मलठण – राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांना दौंड विधानसभेसाठी उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी आढावा बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार पार्टीची आढावा बैठक दौंड येथील प्राईम स्क्वेअर हॉटेल येथे पार पडली. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पार्टीचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, कार्याध्यक्ष महादेव कोंढरे, दौंड तालुक्याचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
बैठकीमध्ये दौंड तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या सूचना तसेच येणाऱ्या विधानसभेमध्ये पक्षाची रणनीती कशा प्रकारे करता येईल, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आप्पासाहेब पवार यांना विधानसभेची उमेदवारी द्या, अशी कार्यकर्त्यांनी जोरदार मागणी केली. आप्पासाहेब पवार हे तालुक्यातील तळागाळातील लोकांशी संपर्क ठेऊन त्यांचे प्रश्न हाताळत आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन संयमी प्रचार केला आहे. दरम्यान, आप्पासाहेब पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी प्रतिक्रिया गेल्या महिन्यांपासून उमटत आहे.
यावेळी नवीन पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दौंड तालुक्यातील अभूतपूर्व यशाबद्दल उपस्थित सर्व पदाधिकारी आणि बूथ कमिटीतील कार्यकर्त्यांचे अभिनंदन महादेव कोंढरे यांनी केले. दौंड तालुक्यातील जनतेचे आभार जगन्नाथ बापू शेवाळे यांनी मानले.
बैठकीसाठी नामदेव बापू ताकवणे, सोहेल खान, रामभाऊ टुले, उदय फडतरे, अजित शितोळे, सचिन गायकवाड, सचिन काळभोर, मनीषा सोनवणे, योगिता जोंधळे, पूर्वा शहा, असिफ शेख, श्रेयस सोनवणे, शुभम दोरगे, दीपक पारदासानी, चैतन्य पाटोळे, मंगेश गायकवाड तसेच दौंड तालुक्यातील सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





