पुणे जिल्हा : महामार्गाला विरोध नाही, मात्र मोबदला योग्य द्या

– लोणी येथील शेतकऱ्यांच्या सभेत मागणी
– दहा पदरी रस्त्याबाबत राज्य शासनाचे अभिनंदन
लोणी धामणी – पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गास आमचा विरोध नाही. मात्र, प्रकल्पासाठी जाणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला मिळायाला हवा. तसेच आपल्या परिसरातून प्रथमच १० पदरी रस्ता जात असल्याने शासनाच्या अभिनंदनाचा ठराव लोणी (ता.आंबेगाव) येथे पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांच्या सभेत घेण्यात आला.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातून पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग जात आहे, हा महामार्ग तालुक्यातील लोणी, धामणी, खडकवाडी, पोंदेवाडी, काठापुर बुद्रुक, भागडी,शिंगवे या गावांमधून जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती बाधित होत असून, या महामार्गाला शेतकऱ्यांनी बाधित शेतीचा योग्य मोबदला न मिळाल्याने विरोध केला आहे. या महामार्गाची रुंदी ही ९० ते ११० मीटर असणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बागायती क्षेत्र या महामार्गामुळे बाधित होणार आहे.
आंबेगाव पूर्व भागातील लोणी धामणी, खडकवाडी ही गावे अगोदरच म्हाळसाकांत जलसिंचन प्रकल्प मार्गी न लागल्याने दुष्काळग्रस्त म्हणून ओळखली जात आहेत. त्यामुळे या गावांतील काही ग्रामस्थ पुणे, मुंबई, ठाणे या ठिकाणी नोकरीसाठी आहेत. महामार्ग या परिसरातून जाणे हे फायद्याचे आहे. मात्र, बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीला अपेक्षेपेक्षा कमी भाव मिळाला. तर, शेतकरी उद्ध्वस्त होणार असल्याचे माजी सरपंच उद्धव लंके यांनी सांगितले.
तसेच या परिसरातून औद्योगिक मार्ग होणे हे या परिसरासाठी वरदान ठरणार असून रस्त्यालगतच्या गावांचा विकास होणार आहे. लवकरच माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील व राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत लोणी येथे बैठक घेणार असून शेतकऱ्यांच्या मनातील गैरसमज दूर करणार असल्याचे पंचायत समितीचे सदस्य रवींद्र करंजखेलें यांनी सांगितले.
या वेळी सरपंच सावळेराम नाईक,माजी सरपंच अनिल डोके, सुनील जाधव, दिलीप वाळुंज,किरण वाळुंज, संतोष पडवळ, पोलीस पाटील संदीप आढाव, बाळशीराम वाळुंज, प्रकाश शिनलकर, सतिश थोरात, लौकिक खंडागळे, बाळासो कोचर,जगन लंके, दत्तात्रय सूक्रे, राहुल आढाव व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
मोबदला चांगला द्या
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच आमदार दिलीप मोहिते, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील व परिसरातील शेतकरी यांच्या मंत्रालयातील बैठकीत रस्त्याच्या मोबदल्या संदर्भातील चर्चेत प्रकल्पाची माहिती नसल्याचे उपुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकल्पाला स्थगिती देण्यात यावी, अश्या प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र, औद्योगिक महामार्गाच्या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. मात्र, बाधित शेतीचा मोबदला चांगला द्या, असा ठराव आज घेण्यात आला.





