पुणे जिल्हा : आता आमदारकी, खासदारकी नको

शरद पवार : पुन्हा राज्यसभेवर जाण्यासंदर्भात निर्णय घ्यावा लागणार
बारामती – माजी राज्यसभेची दीड वर्षे राहिली आहेत. आयुष्यात 14 निवडणुका लढलो कोणीही कधीही कमी केले नाही. आता मला आमदारकी नको, खासदारकी नको, पुन्हा राज्यसभेवर जाण्यासंदर्भात निर्णय घ्यावा लागेल मला आता निवडणुका लढवायच्या नाहीत उरलेल्या काळात लोकांच्या चेहर्यावर आनंद आणण्यासाठी व त्यांना समृद्ध करण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी सांगितले.
एका अर्थाने शरद पवार आता संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याच्या तयारीत आहेत, मात्र त्याचवेळी पुढील 35 वर्षांसाठी आता नवीन नेतृत्व तयार करावे लागेल असे देखील शरद पवार बोलून गेले आहेत. बारामती तालुक्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सुपे येथील सभेत शरद पवारांनी वरील वक्तव्य केले.
शरद पवारांचे हे वक्तव्य महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. शरद पवार म्हणाले, आता मी सत्तेत नाही. राज्यसभेत आहे. अजून माझे दीड वर्ष आहे. त्यानंतर राज्यसभेत जायचे का नाही याचा विचार मला करावा लागेल. मी कसलीही निवडणूक लढणार नाही. आतापर्यंत 14 निवडणुका लढवल्या. तुम्ही असे लोक आहात की एकदाही घरी पाठवले नाही. प्रत्येक वेळेस निवडूनच देत आहात. मी आजवर समाजकारण सोडले नाही, पण आता लोकांचे काम करत राहणार आहे.
अर्थात असे असले तरी राज्य नीट चालले पाहिजे. राज्याचा चेहरा बदलला पाहिजे. त्यासाठी नवी पिढी तयार केली पाहिजे. आज राज्य ज्यांच्या ताब्यात आहे, ते व्यवस्थित राज्य चालवत नाहीत म्हणून महाराष्ट्रात नव्या नेतृत्वाची फळी उभा करण्याचा संकल्प आम्ही लोकांनी केला आहे. त्याला तुम्हा लोकांची साथ पाहिजे. मी निवडणूक लढविली तेव्हा 30 वर्षे माझ्याकडे नेतृत्व आले त्यानंतर पुढील 30 वर्षे अजितदादांकडे नेतृत्व सोपवले, पण आता पुढच्या 30 वर्षांची व्यवस्था करायची आवश्यकता आहे.
ते करायचे असेल तर लोकांच्यामध्ये जाऊन लोकांचे प्रश्न सोडवणे याच्यात लक्ष घालण्याची दृष्टी पाहिजे. मी बरीच कामे केली. शेतकर्यांच्या डोक्यावरचे 70 हजार कोटीचे कर्ज माफ केले. संरक्षण मंत्री म्हणून लष्करामध्ये मुलींना संधी दिली. आज त्या देशाच संरक्षण करतात.
राज्यात 50 टक्के भगिनींना अधिकार दिले
महाराष्ट्राची सत्ता असताना राज्यातील 50 टक्के भगिनींना पुरुषांना इतका अधिकार देण्याचा कायदा केला. जिल्हा परिषद, नगरपरिषद या सर्व ठिकाणी 50 टक्के महिला काम करतात ही स्थिती निर्माण केली. कर्तृत्वाची संधी महिलांना दिल्यानंतर पुरुषांइतके त्याही काम करतात हे आम्हाला बघायचे होते, असे शरद पवार यांनी नमूद केले.





