Pune District : निमगाव सावात सक्षम तू कार्यशाळा उत्साहात

विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन, नेतृत्वगुणांची करून दिली जाणीव
बेल्हे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त श्री पांडुरंग ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील दिलीप वळसे पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि श्री पांडुरंग कनिष्ठ महाविद्यालयात महिला सबलीकरण मंच आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या संयुक्त विद्यमाने सक्षम तू या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्दिष्ट विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि नेतृत्वगुणांची जाणीव निर्माण करणे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व पांडुरंग प्रतिमा पूजन आणि विद्यापीठ गीताने झाली. यानंतर प्रमुख पाहुणे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला निरीक्षक उज्ज्वला शेवाळे, जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष सुप्रिया लेंडे, हवालदार सुवर्णा गडगे, पंडित नेहरू विद्यालयातील प्राध्यापिका शर्मिला आहेर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला उपाध्यक्ष कविता पवार यांनी विचार मांडले.
नारायणगाव पोलीस स्टेशन दामिनी पथक कॉन्स्टेबल शेख अलीषा यांनी सक्षम तू याविषयावर मार्गदर्शन केले.
तसेच कार्यशाळेत दोन सत्रांद्वारे स्व-संरक्षण, आत्मभान, नेतृत्व विकास आणि समुपदेशन या महत्त्वाच्या विषयांवर माहिती व प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद शिंदे यांनी कार्यशाळेचे आयोजन हे काळाची गरज असल्याचे नमूद करत पुणे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, संस्थेचे अध्यक्ष संदिपान पवार, संस्था प्रतिनिधी कविता पवार यांचे मार्गदर्शन लाभले. महिला सबलीकरण मंचाच्या समन्वयक प्रा. नीलम गायकवाड यांनी प्रास्ताविक व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्योती गायकवाड यांनी सूत्रसंचालन तर रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. माधुरी भोर यांनी आभार मानले.





