चाकण : गेल्या दहा वर्षांमध्ये भारताने संरक्षण सज्जतेत मोठी झेप घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मेक इन इंडियासारख्या योजनांचा योग्य लाभ घेऊन निबे डिफेन्स अॅन्ड एअरोस्पेस कंपनी ने संरक्षण क्षेत्रातील विविध आयुधे व उपकरणे तयार करण्याच्या दृष्टीने अतिशय कमी वेळेत जोरदार वाटचाल केली आहे. यामध्ये कंपनीचे अध्यक्ष गणेश निबे यांच्या दूरदृष्टीचे प्रतिबिंब दिसून येत आहे. देशाच्या संरक्षण सज्जतेत निबे डिफेन्स अॅन्ड एअरोस्पेस मोलाचा वाटा उचलण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. चाकण एमआयडीसीमधील निबे डिफेन्स अॅन्ड एअरोस्पेस कंपनीच्या वर्धापन दिनानिमित्ताने सुसज्ज मिसाईल व स्मॉल आर्म्स कॉम्प्लेक्सचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते फीत कापून गुरुवारी (दि. 6) करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, भोसरीचे आमदार महेश लांडगे, निबे डिफेन्सचे अध्यक्ष गणेश निबे, सीईओ बालकृष्णन् स्वामी, एल अन्ड टी डिफेन्सचे व्हाईस प्रेसिडेंट अरुण रामचंदानी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कंपनीचे रायगड गेटचे उद्घाटन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन, शिर्डीतील अम्युझमेंट पार्कचे उद्घाटनदेखील करण्यात आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह या वेळी उपस्थित पाहुण्यांनी कंपनीच्या नवीन कॉम्प्लेक्सची व निबे कंपनीच्या नव्या संरक्षण केंद्रांची पाहणी केली. शासनाने निबे डिफेन्सला 25 एकर जमीन द्यावी, ज्यामध्ये आम्ही नव्या पिढीला संरक्षण क्षेत्रातील प्रशिक्षण तसेच आधुनिक ज्ञान देण्याचे कार्य करू शकू, असे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना निबे डिफेन्सचे चेअरमन गणेश निबे यांनी मागणी केली आहे. देशाच्या संरक्षणासाठी लागणारी उपकरणे तसेच मिसाईल, बंदुका व काडतूस अत्यंत माफक किमतीत तयार करण्याचे काम निबे डिफेन्सकडून करण्यात येत आहे. यातून देशाच्या पैशांची मोठी बचत होणार आहे. दोन लाखात मिळणारी एके-47 रायफल निबे डिफेन्सकडून केवळ 40 हजारात सरकारला उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय इतर आयुधेदेखील देशाला स्वस्तात मिळणार आहे. – अजित पवार, उपमुख्यमंत्री