लोणी काळभोर – हवेली तालुक्यातील 71 पैकी 66 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण अडीच महिन्यांनंतर पुन्हा काढण्यात येणार आहे. अडीच महिन्यांपूर्वी काढलेले आरक्षण रद्द करण्यात आल्यामुळे नव्याने सरपंचपदाच्या आरक्षणासाठी शुक्रवारी (दि. 11 जुलै) दुपारी बारा वाजता नव्याने आरक्षण काढण्यात येणार आहे अशी माहिती हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी दिली. पुण्यातील सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात ही सोडत काढली जाणार आहे. आगळंबे, निरगुडी, वडगाव शिंदे, फुलगाव, कल्याण या पाच ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण या सोडतीत होणार नाही. हवेली तालुक्यातील ग्रामस्थ आणि इच्छुक उमेदवारांमध्ये या सोडतीबाबत प्रचंड उत्सुकता आहे. कोणत्या गावात कोणता प्रवर्ग आरक्षित होणार, यावर निवडणुकीचे गणित अवलंबून असेल. तालुक्यातील राजकीय वातावरण या सोडतीनंतर अधिक तापण्याची शक्यता आहे. यापूर्वी हवेली तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले होते; मात्र ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर ही प्रक्रिया पुन्हा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, शुक्रवारी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार आहे. ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण आता नव्याने सुनिश्चित करण्यात येणार आहे. लोकसंख्येचा विचार करून कोणत्या प्रवर्गासाठी किती सरपंचपद द्यावेत, याची आकडेवारीही आदेशासोबत जोडण्यात आली आहे. तालूक्यातील 71 ग्रामपंचायतींच्या 13 जून 2025 ते 12 जून 2030 या कालावधीत होणार्या निवडणुकीसाठी सरपंच पदाचे आरक्षण 24 एप्रिल 2025 रोजी जाहीर करण्यात आले होते. सरपंच पदाची जागा कोणाला सुटली हे स्पष्ट झाल्याने गावगाड्यातील भावी सरपंच कामाला लागले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर आता परत सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे यापूर्वी जाहीर झालेले आरक्षण कायम रहाणार कि बदलणार याची उत्सुकता इच्छुक उमेदवारांना लागली आहे.