पुणे जिल्हा : पौड पोलीस स्टेशनकरिता नवीन संपर्क क्रमांक

पौड : मुळशी तालुक्यातील ग्रामस्थांना पौड पोलीस ठाण्याशी संपर्क करणे आता सोपे झाले आहे. पोलीस ठाण्याच्यावतीने 7522990100 मोबाईल नंबर सुरू करण्यात आला आहे. या नंबरवरून ग्रामस्थांनी पौड पोलिसांशी आवश्यकतेनुसार संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी केले आहे.
पौड पोलीस ठाण्यात ग्रामस्थांना तातडीने फिर्याद देण्यासाठी किंवा गावातील दोन गटांतील वाद, भांडणे अपघाताची माहिती देण्यासाठी बीएसएनएल कंपनीचा लँडलाईन नंबर होता; परंतु हा फोन बंद झाल्याने मुळशीकरांना पोलिसांशी संपर्क साधणे कठीण होत होते. तसेच पोलीस ठाण्यातही दररोज ठाणे अंमलदार बदलत असल्याने नक्की कुणाशी संपर्क करावा, असा प्रश्न मुळशीकरांना पडत होता.
संतोष गिरीगोसावी यांनी पोलीस निरीक्षक पदाचा कारभार हातात घेतल्यानंतर त्यांनी तालुक्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काही महत्त्वपूर्ण बदल केले.
तालुक्यातील कानाकोपर्यातील ग्रामस्थांना तातडीच्या कारणांसाठी पोलिसांशी तात्काळ संपर्क साधता यावा यासाठी त्यांनी 7522990100 मोबाईल नंबर सुरू केला आहे. हा मोबाईल 24 तास सुरू राहणार असल्याने ग्रामस्थांना पोलीस ठाण्याशी संपर्क करणे सोपे होणार आहे.





