Pune District : नीरा-शिवतक्रार ग्रामस्थांनी रस्ता रोखला

रास्ता रोको आंदोलन : रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
नीरा – नीरा-शिवतक्रार (ता. पुरंदर) येथील परिसरात ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी 10 वाजता रास्ता रोको आंदोलन केले. वारंवार रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करून देखील हा रस्ता दुरुस्त केला जात नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी निरा बारामती रस्त्यावर ठिय्या मांडत रस्ता अडवून धरला.
राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक ते शिवतक्रार गावठाण जाणारा प्रमुख रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खड्यांमुळे खराब झाला आहे. पावसामुळे हा रस्ता दयनीय अवस्थेत आहे. त्यामुळे शाळकरी मुलांसह महिला, नागरिक, दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी शासन आणि प्रशासनाकडे वारंवार करूनही प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी अखेर लोकशाही मार्गाने आंदोलनाचा मार्ग अवलंबला. या आंदोलनाचे नेतृत्व माजी जिल्हा परिषद सभापती दत्ता चव्हाण यांनी केले. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामासाठी सकारात्मक आश्वासन दिल्याने आणि पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
आंदोलनात लक्ष्मण चव्हाण, चंद्रकांत धायगुडे, कल्याण जेधे, मदन चव्हाण, शिवाजी लकडे, गणपत लकडे, भाऊसाहेब धायगुडे, नामदेव बिचकुले, विश्वास लकडे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रामस्थांनी जिल्हा नियोजन व इतर निधीतून रस्ता करण्याची मागणी केली असून, प्रशासनाने लवकरात लवकर काम हाती घ्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केला आहे.





