पुणे जिल्हा : विषमुक्त अन्नासाठी भारत व ग्रीसच्या सहकार्याची गरज

थानोस पराचोस : अष्टापूरला पहिल्या इंडो ग्रीस स्टार्टअप कार्यालयाचे भूमिपूजन
लोणी काळभोर – शेतीमधील रासायनिक खतांचे प्रमाण कमी करुन सेंद्रिय शेती करण्याची गरज निर्माण झाली आहे. आगामी पिढीला विषमुक्त, दर्जेदार अन्नधान्य देण्यासाठी भारत आणि ग्रीस यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे, असे मत स्टार्ट अप ग्रीसचे अध्यक्ष थानोस पराचोस यांनी व्यक्त केले.
इंडो ग्रीस बिजनेस फोरम, अर्थ गार्ड सोल्युशन्स व सेव्ह सॉईल टेक या संस्थांच्या वतीने भारतातील पहिल्या इंडो ग्रीस स्टार्टअप कार्यालयाचे भूमिपूजन अष्टापूर (ता. हवेली) येथे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी समृद्धी एअरसन्सचे संस्थापक अजय सोनावणे, नामवंत वास्तूरचनाकार आशिष शेठ, स्टार्ट अप ग्रीसच्या ऑलिम्पिया कोक्का, इंडो ग्रीस बिझनेस फोरमच्या डॉ. भावना कडू, अर्थ गार्ड सोल्युशन्सचे संस्थापक विजय गायकवाड, संचालक सचिन काळभोर, सॉइल फर्टिलिटी इन्स्टिट्यूटचे संतोष लाटणेकर, बाजार समिती संचालक प्रकाश जगताप, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप आदी उपस्थित होते.
माती समस्या आणि उपाय या विषयावर सॉइल फर्टीलिटी इन्स्टिट्युटचे माती आरोग्य अभ्यासक संतोष लाटणेकर यांनी मार्गदर्शन करून उत्तरे दिली. मातीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी, कचरा व्यवस्थापन, विघटन आणि दुर्गंधी घालवण्यासाठी निर्माण केलेले मृदा (माती कंडिशनर) आणि उर्वरा (डीकम्पोजर) या दोन सेंद्रिय खतांच्या वाटपाचा शुभारंभ थानोस पराचोस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी परदेशी पाहुण्यांना पुरणपोळीचे जेवण देण्यात आले. समृद्धी सोनावणे यांच्या हस्ते ऑलिम्पिया कोक्का यांना पैठणी साडी व नथ भेट देण्यात आली. थानोस पराचोस यांना इंग्रजी भगवद्गीता देऊन हिंदू धर्माची माहिती देण्यात आली.
सेंद्रिय शेतीसंदर्भात आपण करत असलेले कार्य जागतिक पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी खूप मोठी सेवा आहे. शेतजमिनीला तन्मयतेने सांभाळण्याचे महत्वाचे काम आपण करत आहात. मातीतील सेंद्रिय कर्ब, कचरा व्यवस्थापन, विघटन आणि दुर्गंधी यांचा अभ्यास करून तयार केलेले सेंद्रिय खत विषमुक्त शेतीसाठी मैलाचा दगड आहे. जगात कोठेही आणि कितीही प्रमाणात बनवू शकणारे तंत्रज्ञान तुम्ही विकसित केले आहे. नापिक जमीन 150 दिवसात सुपीक करणारी सेंद्रिय खते जगातील शेतीसाठी संजीवनी ठरतील याची मला खात्री आहे. ही खते ग्रीस आणि युरोपमध्ये कशी पोचवता येईल.
-थानोस पराचोस, अध्यक्ष स्टार्टअप ग्रीस





