राजगुरूनगर – ‘माझे कुटुंब माझी पेन्शन’ या मागणीसाठी गुरुवार (दि. 14) पासून खेड तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाल्याने खेड तहसीलदार कार्यालयात शुकशुकाट होता. माझे कुटुंब माझी पेन्शन या मागणीसाठी राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपात गुरुवारपासून सहभागी झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या मागणीसाठी कर्मचारी आंदोलने मोर्चे काढून सरकारकडे मागणी करीत आहेत.
अनेक संघटना या संपत सहभागी झाल्या आहेत. कर्मचार्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने सर्वच कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. प्रलंबित मागण्यांकडे शिंदे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर बेमुदत संपाचे हत्यार राज्यातील 17 लाख सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उगारले आहे. शासन दखल घेत नाही. त्यामुळे कर्मचारी कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. माझे कुटुंब-माझी पेन्शन या मागणीसाठी बेमुदत संपावर गेले आहेत.
त्याअनुषंगाने पुणे जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी पदोन्नत नायब तहसीलदार, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, वाहनचालक, शिपाई व कोतवाल कर्मचारी या संपत सहभागी झाले आहेत. खेड तहसीलदार कार्यालयातील सर्व कर्मचारी या संपत सहभागी होणार असल्याचे निवेदन बुधवारी (दि. 13) खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांना दिले होते आणि गुरुवारी ते या संपात सर्व कर्मचारी सहभागी झाले. निवेदन देताना आर. जे. वाल्मिकी, अविनाश कुलकर्णी, एस. जे. खराटे, जी. वाय. मरभळ, आर. डी. लाडके, ए. एस. नवले यांच्यासह महसूल विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांना मोठा फटका
संपाबाबत ग्रामीण भागातील नागरिकांना संपाची कल्पना नसल्याने ते तहसीलदार कार्यालयात विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी आले होते. त्यांना मात्र याचा मोठा फटाका बसला. महसूल कर्मचारी संपात सहभागी असल्याने नागरिकांची अनेक कामे रखडणार आहेत.
राजगुरूनगर : माझे कुटुंब- माझी पेन्शन या मागणी व संपात सहभागी होत असल्याचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन देताना खेड महसूल विभागाचे कर्मचारी.