Pune District : नगरपरिषदांच्या निवडणुकीचे पडघम वाजले

भोर – महाराष्ट्र राज्य नगरविकास विभागाने नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला असून भोर नगरपरिषद क्षेत्रातील प्रारूप प्रभाग रचनेस १३ ऑगस्टला मान्यता मिळाली आहे. या प्रभाग रचनेवर हरकती किंवा सूचना करावयाची असल्यास ३१ ऑगस्टपर्यंत मुदत असल्याची माहिती भोर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी दिली.
भोर नगरपरिषद स्तरावर स्थापन झालेल्या प्रभाग रचना समितीने विहीत कालमर्यादेत प्रारूप प्रभाग रचना तयार केली. पुणे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नगरविकास मंत्रालयाकडे ती सादर करण्यात आली. या प्रस्तावास मान्यता देण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, विभागीय आयुक्तांना प्रदान करण्यात आले. यानुसार पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी १३ ऑगस्ट २०२५ रोजी प्रभाग रचनेस मान्यता दिली.
भोर नगरपरिषदेच्या मागील निवडणुकीच्या वेळी ८ प्रभाग होते. या ८ प्रभागांमधून १७ नगरसेवक निवडून आले होते. आगामी निवडणुकीच्या वेळी नवीन प्रभाग रचनेनुसार नगरपरिषद क्षेत्रात २ प्रभाग अधिक केले असून १० प्रभागांमधून २० नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. याशिवाय नगराध्यक्षपदही वेगळे आहे. यामुळे भोर नगरपरिषदेत नगराध्यक्षांसह २१ सदस्य राहणार आहेत. नवीन प्रभाग रचना तयार करताना नगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या व आणि भौगोलिक बाबींचा विचार केलेला आहे.
नियोजित प्रारूप प्रभाग रचनेचा तपशील सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावा यासाठी भोर नगरपरिषद कार्यालयातील नोटीस बोर्डावर तसेच नगरपरिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. इच्छुक नागरिकांनी हरकती व सूचना लेखी स्वरुपात नगर परिषदेच्या कार्यालयातील निवडणूक विभागात सादर कराव्यात. त्यांना सुनावणीची स्वतंत्रपणे माहिती देण्यात येईल. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या हरकती व सूचनांचा विचार केला जाणार नाही, असे नगर परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी सहभाग घ्यावा
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना हा महत्त्वाचा टप्पा आहे. प्रभागनिहाय मतदारसंख्या, भौगोलिक व लोकसंख्येच्या आधारावर ही रचना करण्यात आली आहे. नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून योग्य त्या हरकती व सूचना सादर कराव्यात, असे आवाहन भोर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी केले आहे.





